फोटो : A15068
नाशिक : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने जप्त केलेला मसाल्याचा साठा
--
निकृष्ट दर्जाचा २२३० किलो मसाला जप्त
द्वारका परिसरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई
सकाळ वृत्तसेवा
नाशिक/ जुने नाशिक, ता. २३ : सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शहरात विशेष मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेअंतर्गत द्वारका परिसरातील मे. सोमेश्वर घरगुती मसाले या आस्थापनेवर धाड टाकून तब्बल ११ लाख ८६ हजार २०० रुपये किमतीचा २ हजार २३० किलो मसाल्यांचा साठा जप्त करण्यात आला. लेबलिंग नियमांचे उल्लंघन आणि निकृष्ट दर्जाच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली.
अन्नसुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे, सहआयुक्त मंगेश माने आणि सहायक आयुक्त (अन्न) व्ही. पी. धवड यांच्या मार्गदर्शनाखाली २२ ऑक्टोबरला द्वारका येथील तिगरानिया औद्योगिक क्षेत्रातील तृप्ती सागर धवन यांच्या मे. सोमेश्वर घरगुती मसाले या पेढीवर ही तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान अन्नपदार्थांवर चुकीचे लेबलिंग आढळले, तसेच पदार्थांचा दर्जा निर्धारित निकषांनुसार नसल्याचा संशय आल्याने अधिकाऱ्यांनी साठा जप्त केला. अन्न सुरक्षा अधिकारी अश्विनी पाटील व ऋतुजा नवले यांनी ही कारवाई केली. जप्त केलेल्या नमुन्यांची पुढील तपासणी प्रयोगशाळेत केली जाणार आहे.
---
जप्त मसाल्यांचा तपशील :
- हळद पावडर : ३३८ किलो (किंमत २,०२,८००)
- कांदा-लसूण मसाला : ४८ किलो (किंमत १९,२००)
- धणे पावडर : २८८ किलो (किंमत १,१५,२००)
- सुपर मिक्स गरम मसाला : २१६ किलो (किंमत ७५,६००)
- स्पेशल मिक्स काळा मसाला : ६६४ किलो (किंमत २,६६,४००)
काळा मसाला : ३३८ किलो (किंमत २,३६,६००)
मिरची पावडर : ३३८ किलो (किंमत २,७०,४००)
साठा : २,२३० किलो
एकूण किंमत : ११,८६,२००