SKD26B04336
शिंदखेडा : प्रभाग १६ मध्ये पाणीपुरवठ्याच्या चाचणीप्रसंगी नगराध्यक्ष कलावती माळी, नगरसेविका पुष्पा सोनवणे, प्रा. दीपक माळी, मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर.
----------------
शिंदखेड्यात पाणीपुरवठा योजनेची यशस्वी चाचणी
नळजोडणी तातडीने करून घेण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
शिंदखेडा, ता. ८ : शिंदखेडा शहरात कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेची प्रभाग १६ मधील चाचणी यशस्वी झाली असून, पाण्याच्या दबावामुळे आता थेट वरच्या मजल्यापर्यंत विना विद्युत मोटर पाणी येणे शक्य होणार आहे. योजनेची नळ जोडणी लवकरात लवकर करावी, असे आवाहन मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांनी केले.
प्रभाग १६ मधील लालचंदनगर, महावीरनगर, विजयनगर, धनश्री कॉलनी आणि किसान कॉलनी या भागात नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत वितरण पाइपलाइनचे काम पूर्ण झाले आहे. नगरपंचायतीकडून नागरिकांच्या घरापर्यंत नवीन कनेक्शन काढून देण्यात आले असून, आता नागरिकांनी घरातील नळजोडणी तातडीने करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नगराध्यक्ष कलावती माळी, मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर, पाणीपुरवठा अभियंता विपुल साळुंखे, नगरसेविका पुष्पा सोनवणे, नगरसेवक प्रा. दीपक माळी, पाणीपुरवठा कर्मचारी पंडित माळी, राहुल सोनवणे व कॉलनीतील नागरिक उपस्थित होते.
शिंदखेडा शहराला दरवर्षी भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या पुढाकारातून प्रथम २१ कोटी रुपयांची फेज- १ व २३ कोटींची फेज- २ अशा दोन योजना मंजूर करण्यात आल्या होत्या. प्रभाग १ ते ११ मधील वितरण व्यवस्थेचे कामही पूर्ण झाले असून, लवकरच त्याची चाचणी घेण्यात येणार आहे. नागरिकांनी नवीन नळजोडणी करून घेतल्यास दोन दिवसाआड पाणीपुरवठा करणे शक्य होईल, अशी माहिती नगरपंचायतीकडून देण्यात आली.