‘सूर्योदय’ राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर
सतीश जैन : तेरा डिसेंबरला जळगावच्या संमेलनात वितरण
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ६ : जळगाव येथील सूर्योदय समावेश मंडळातर्फे यंदाचे ''सूर्योदय'' साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले. १३ डिसेंबर रोजी जळगाव येथे होणाऱ्या चोविसाव्या राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष सतीश जैन यांनी दिली. यात नाशिकच्या आरती डिंगोरे व राजेंद्र दिघे यांच्या पुस्तकांना सन्मानित करण्यात येणार आहे.
राज्यस्तरीय सूर्योदय साहित्य पुरस्कार दीपक तांबोळी (जळगाव) यांच्या ‘मृगजळ’ कथासंग्रहाला, ‘सूर्योदय गझल पुरस्कार’ मकरंद घाणेकर (पुणे) यांचा ‘मनस्वी’ गझल संग्रह व सोनाली बेले (नांदेड) यांच्या ‘अर्थ व्हॉट इट मिन्स टू बी’ या काव्यसंग्रहाला, ‘राज्यस्तरीय सूर्योदय वाङमय पुरस्कार’ मनीषा कुलकर्णी-आष्टीकर(परभणी) यांच्या ‘चंद्रचाहुल’ तर आरती डिंगोरे (नाशिक) यांच्या ‘अभिरम्य’ ललित लेख संग्रहाला विभागून, ‘सूर्योदय साहित्य पुरस्कार’ पुष्पा साळवे (जळगाव ) यांच्या ‘मनाच्या व्यथा’ या काव्यसंग्रहाला, ‘सूर्योदय निर्मलगंध पुरस्कार’ प्रशांत पनवेलकर (वर्धा) यांच्या ‘गडद संदर्भांचा अन्वयार्थ’ या काव्यसंग्रहाला, ‘राज्यस्तरीय सूर्योदय बालसाहित्य पुरस्कार’ राजेंद्र दिघे (मालेगाव) यांच्या ‘पाखरांची गाणी’ या बालकाव्य संग्रहाला, खानदेशस्तरीय सूर्योदय काव्य पुरस्कार अरविंदा भामरे (धुळे) यांच्या ‘शापित कोलाहलाच्या नोंदी’ व एकनाथ देशमुख (जळगाव ) यांच्या ‘गाथा एक नाथा’ या काव्यसंग्रहांना विभागून तर सूर्योदय काव्यरंग पुरस्कार रंजना बोरा (नाशिक) यांच्या ‘मनपर्ण’ या काव्यसंग्रहाला जाहीर करण्यात आला आहे.