दिवाळीपूर्वी प्रश्न न सुटल्यास
शिक्षकांचा आंदोलनाचा इशारा
नाशिक, ता. ८ : ‘सेंट टू ईओ ऑथरायझेशन’ टॅब बंद झाल्याने जिल्ह्यातील दीडशेहून अधिक शाळांमधील दोन हजारांपेक्षा अधिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिवाळीपूर्वी प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने दिला आहे.
या प्रश्नासह प्रलंबित मान्यता व समायोजनाच्या विषयांवर परिषदेने शिक्षणाधिकारी सरोज जगताप, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र बोडके व नरेश पाटील यांच्यासोबत सहविचार सभा घेतली. पुणे येथे शिक्षण आयुक्तांसोबत झालेल्या चर्चेचा संदर्भ देत पदाधिकाऱ्यांनी प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधले. शिक्षण विभागातील अपुरे मनुष्यबळ आणि एसआयटी चौकशीच्या कामांचा ताण असतानाही वेतनाचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी जगताप यांनी दिले. त्यानुसार पोस्ट शिफ्टिंग २० ऑक्टोबरपर्यंत, ग्रंथपाल समायोजन १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे ठरले. प्रयोगशाळा सहाय्यक व अनुकंपा प्रकरणे तातडीने निकाली काढणे, मुख्याध्यापकांना मान्यता देणे तसेच स्वाक्षरी अधिकार तातडीने देऊन वेतन अडकू न देण्याचा निर्णय घेण्यात आला.
दिवाळीपूर्वी वेतन व मान्यतेचे प्रश्न निकाली न निघाल्यास आंदोलन करण्याचा इशारा परिषदेचे विजय बडे यांनी दिला. यावेळी डी. यू. अहिरे, दत्ता वाघे, संजय पाटील, विलास सोनार, अनिल देवरे, गोरख कुनगर, भगवान पानपाटील आदी उपस्थित होते.