07461
सटाणा : संशयित खुर्शीद अब्दुल हमीद खान याला अटक केल्यानंतर पोलिस निरीक्षक योगेश पाटील, पोलिस हवालदार योगेश शेवाळे आणि समाधान कदम.
टायर चोरट्याला नऊ वर्षानंतर अटक
सटाणा पोलिसांची कामगिरी; मुद्देमाल हस्तगत
सकाळ वृत्तसेवा
सटाणा, ता. २३ : टायर चोरीच्या गुन्ह्यात नऊ वर्षांपासून फरार असलेल्या उत्तर प्रदेशातील खुर्शीद अब्दुल हमीद खान (वय ३६) याला सटाणा पोलिसांनी अटक केली. २०१७ मध्ये दाखल झालेल्या या गुन्ह्यातील संशयिताचा दीर्घकाळापासून शोध सुरू होता.
सटाणा पोलिस ठाण्यात २०१७ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात संजय काशिनाथ पवार (वय ५१, रा. सन्मित्र हौसिंग सोसायटी, सटाणा) यांनी फिर्याद दिली होती. या गुन्ह्यातील इतर तीन संशयितांना यापूर्वी अटक करण्यात आली होती. खुर्शीद अब्दुल हमीद खान आणि मोहम्मद चांद अन्सारी या आरोपीविरुद्ध २३ मे २०१७ मध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून हा खटला न्यायालयात प्रलंबित आहे.
दाखल गुन्ह्यात पवार यांच्या फिर्यादीनुसार विविध प्रकारचे ११६ टायर चोरीला गेले होते. त्यांची एकूण किंमत चार लाख ६७ हजार रुपये होती. त्यापैकी ९१ टायर, अंदाजे दोन लाख ६१ हजार रुपये किमतीचे, हस्तगत करण्यात आले होते. खुर्शीद खान (वय ३६, रा. धानौरा, ता. शोहरतगड, जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) याला २१ ऑक्टोबरच्या रात्री १० वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास अटक करण्यात आली. या कारवाईत पोलिस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार योगेश शेवाळे आणि शिपाई समाधान कदम यांच्या पथकाने सहभाग घेतला.