फोटो : B16728
एकलहरे : सिद्धार्थनगर परिसरात भंगाराच्या दुकानाचे आगीत झालेले नुकसान.
--
सिद्धार्थनगरमध्ये पूर्ववैमनस्यातून दुकान जाळले
माजी सरपंचाच्या पतीसह संशयितांविरोधात गुन्हा दाखल
नाशिक रोड, ता. १५ : जुन्या भांडणाचे कुरापत काढून एकलहरे सिद्धार्थनगर परिसरात बुधवारी (ता. १३) एका भंगाराच्या दुकानाला आग लावण्याचा प्रकार रात्री साडेअकराच्या सुमारास घडला. या आगीत शेजारच्या इतर दुकानांना झळ बसल्याने लाखांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी माजी सरपंचाच्या पतीसह इतरांविरोधात नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात सुरेश मुरलीधर जाधव यांनी नाशिक रोड पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की राहुल रद्दी स्क्रॅप व प्लॅस्टिक भंगाराचे दुकान असून बुधवारी सायंकाळी संशयित संदिप उर्फ सागर जाधव, संजय उर्फ पप्पू जाधव, दिलीप जाधव व साथीदारांनी मागील भांडणाची कुरापत काढून ज्वलनशील पदार्थ टाकून दुकानाला आग लावली. या आगीत शेजारी राहणारे संजय बंडू वाघ यांचे दोन्ही पाय भाजले तर अर्चना साबळे यांच्या घरात त्यांच्या दोन मुली झोपलेल्या होत्या, त्या सुदैवाने बचावल्या. दरम्यान या ठिकाणी राहणारे सुनील दिलीप मोकल यांनी सुरेश जाधव यांना आग लागल्याची कल्पना दिली असता त्यांनी घटनास्थळी धाव घेतली, दरम्यान आग लावण्याच्या अगोदर संशयित दिलीप जाधव हे दुचाकीवर येऊन सुरेश मुरलीधर जाधव यांना तुम्ही सागरभाऊला विरोध करता काय तुमची लायकी नाही. दुकाने बंद करा नाही तर जाळून टाकू, अशी धमकी दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलिस करीत आहेत. दरम्यान, काही दिवसापासून एकलहरे येथे अवैध धंद्यावरून दोन गटात वाद सुरू आहे. त्यातूनच हा प्रकार घडला असल्याची चर्चा आहे.