NSK26H29068
त्र्यंबकेश्वर : श्रावणी सोमवारनिमित्त सोमवारी त्र्यंबकराजाची निघालेला पालखी सोहळा (छायाचित्र : कमलाकर अकोलकर)
शेवटच्या श्रावण सोमवारी
त्र्यंबकेश्वर भाविकांनी फुलले
एकादशीचा दुहेरी योग; ‘हर हर महादेव’च्या गजरात प्रदक्षिणा
सकाळ वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर, ता. ७ : श्रावणातील शेवटचा सोमवार आणि एकादशीचा दुहेरी योग साधून सोमवारी (ता.३) त्र्यंबकेश्वर नगरी अक्षरशः भक्तिसागराने फुलून गेली. ‘हर हर महादेव’, ‘भोले हर’च्या अखंड जयघोषात भाविकांनी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले, तर वारकरी संप्रदायातील भाविक सवाद्य भजन-कीर्तन करीत प्रदक्षिणा पूर्ण करताना दिसून आले.
तिसऱ्या श्रावण सोमवारी लाखोंच्या संख्येने भाविकांनी गर्दी केल्याने, शेवटच्या सोमवारी होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी अनेक भाविकांनी रविवारी (ता.६) सायंकाळपासूनच त्र्यंबकेश्वरकडे धाव घेतली. रात्रीच अनेकांनी प्रदक्षिणेसाठी प्रस्थान केले. चौथ्या व शेवटच्या श्रावण सोमवारी गर्दी तुलनेने कमी राहील, असा अंदाज असतानाच आज प्रदक्षिणा मार्ग, गंगाद्वार, ब्रह्मगिरी पर्वत आणि त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
सर्वत्र भक्तिभावाचे वातावरण अनुभवायला मिळत होते. एका बाजूला शिवनामाचा गजर, तर दुसऱ्या बाजूला टाळ-मृदंगाच्या निनादात सुरू असलेले भजन-कीर्तन... अशा आध्यात्मिक वातावरणात भाविकांनी श्रद्धेने प्रदक्षिणा पूर्ण केली. हलक्या पावसाच्या सरींनीही या भक्तिमय सोहळ्यात वेगळीच प्रसन्नता निर्माण केली.
दरम्यान, नाशिक ते त्र्यंबकेश्वर अशी पारंपरिक पायी वारीही आज उत्साहात झाली. या वारीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. वाटेत विविध सेवाभावी मंडळांच्या वतीने भाविकांसाठी चहापान, फळे तसेच उपवासाचे पदार्थ मोफत उपलब्ध करून देण्यात आले.
जय जनार्दन परिवार भक्त मंडळाच्या वतीनेही भक्तिभावाने प्रदक्षिणा करण्यात आली. एकंदरीत संपूर्ण श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर नगरी सतत भाविकांच्या गर्दीने फुलून राहिली. श्रावणातील सोमवार, एकादशी आणि विविध धार्मिक पर्वांच्या निमित्ताने लाखो भाविकांनी येथे हजेरी लावून शिवदर्शनाचा लाभ घेतला.
आता अमावास्येनंतर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील गर्दी काही प्रमाणात ओसरण्याची शक्यता आहे. मात्र, श्रावण महिन्यातील या अखंड भक्तिसोहळ्याने त्र्यंबकेश्वर नगरी पुन्हा एकदा श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माच्या रंगात न्हाऊन निघाली.