पान-३ मेन
फोटो-10263
पिंपळगाव बसवंत ः टोमॅटोची झालेली बंपर आवक.
पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटोचे दर गडगडले
सरासरी शंभर रुपये प्रतिक्रेट दर; चार लाख क्रेटच्या बंपर आवकेचा परिणाम
सकाळ वृत्तसेवा
पिंपळगाव बसवंत, ता. २४ ः महिनाभरापूर्वी २० किलोच्या क्रेटला सरासरी ४०० रुपये भाव असलेल्या टोमॅटोचे दर गडगडले आहेत. रोज होत असलेल्या चार लाख क्रेटच्या आवकेचा दबाव बाजारभावावर आला आहे. त्या तुलनेत मागणी घटली आहे. त्याचा परिणाम पिंपळगाव बाजार समितीत प्रतिक्रेट शंभर रुपये असा दर टोमॅटोला मिळत आहे. मिळणाऱ्या भावातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने आर्थिक गणित कोलमडले आहे.
टोमॅटोच्या दरातील जोरदार चढ-उतारामुळे कधी मालामाल, तर कधी कंगाल अशी अवस्था शेतकऱ्यांची होते. यंदा हंगामात टोमॅटोचे दर पाहता शेतकरी हतबल झाले आहेत. टोमॅटोच्या दराची लाली उतरल्याने शेतकरी हतबल आहेत. तीन महिन्यांपूर्वी टोमॅटोच्या हंगामाचा वाजतगाजत चार हजार रुपये प्रतिक्रेट अशा आकर्षक भावाने सुरवात झाली. हंगामात दोन पैसे मिळतील अशी अपेक्षा होती. पण त्यावर आता पाणी फिरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले आहे.
बाजार समितीतील टोमॅटो निर्यातक्षम असतो. पण यंदा कंटेनरची भाडे, आयात शुल्क यामुळे दुबई, बांगलादेश येथे निर्यात थांबली आहे. हक्काची बाजारपेठ उपलब्ध नसल्याने टोमॅटोच्या दराला घरघर लागली आहे. त्यात गिरणारे, दुगाव, वणी, दिंडोरी येथील मार्केटमध्ये रोज दोन लाख क्रेटची आवक आहे. रतलाम, इंदूरच्या बाजारपेठत हंगाम सुरू आहे. पाऊस महिनाभर अगोदरच माघारी परतल्याने टोमॅटोचे नुकसान झाले नाही. शिवाय कडक उन्हामुळे टोमॅटो पिकण्याची प्रक्रिया जलद होत आहे. त्यामुळे बाजारपेठेत बंपर आवक होत आहे.
टोमॅटोला भाव नसल्याने त्याचा परिणाम पिंपळगांवच्या बाजारपेठेवर होणार आहे. दिवाळीच्या तोंडावर टोमॅटोचे दर कोसळल्याने बाजारपेठेवक त्याचा परिणाम होणार आहे.
------------
कोट
बंपर आवकेच्या तुलनेत मागणी नसल्याने टोमॅटोच्या दरात मंदी आली आहे. शिवाय दुबई, बांगलादेश येथील निर्यात थांबल्याने बाजारभाव कोसळले आहेत.
- सन्मान गायकवाड, टोमॅटो व्यापारी, पिंपळगांव बसवंत
-----------
मिळणाऱ्या भावात उत्पादन खर्चही निघत नाही. अगोदरच शेतकरी दुष्काळाने पिचलेला असताना टोमॅटोचे भाव कोसळल्याने दुष्काळात तेरावा महिना झाला आहे.
-सागर जाधव, टोमॅटो उत्पादक शेतकरी, मुखेड
--------