आदिवासी आंदोलकांचे परस्पर विरोधी दावे

आदिवासी आंदोलकांचे परस्पर विरोधी दावे
Published on: 
आदिवासी आंदोलकांचे परस्पर विरोधी दावे मुंबईतील एक गट पोलिसांच्या ताब्यात; दुसऱ्या गटाकडून नाशिकमध्ये स्वागत सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.५ : आदिवासी वसतिगृहातील असुविधांच्या विरोधात नाशिक ते मुंबई पायी उलगुलान मोर्चा घेवून निघालेल्या आदिवासी युवकांच्या आंदोलनात फूट पडल्यानंतर एक गट नाशिकला परतला. तर दुसरा गट रविवारी (ता.४) मुंबईत पोहोचला. आदिवासी विकास मंत्री प्रा.अशोक उईके यांचा राजीनामा व सचिव वाघमारे व आयुक्त लीना बनसोड यांना हटवण्यासाठी आदिवासी युवकांनी दोन महिने नाशिकमध्ये आंदोलन केले. आंदोलनानंतर थेट मुंबईला पायी निघाले. मुंबईत पोहोचलेल्या गटाने आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी मागितली. परंतु, पोलिसांनी त्यांना गाडीत बसवत वेगवेगळ्या ठिकाणी सोडल्याचा आरोप राहुल पावरा या आंदोलकाने केला. त्यामुळे आदिवासी युवक वेगवेगळ्या ठिकाणी विखुरले गेले आणि त्यांचे आंदोलन हाणून पाडण्याचा पोलिसांनी प्रयत्न केल्याचा आरोप सागर पावरा यांनी केला. पोलिसांनी तब्बल ४ तास गाडीत बसवून मुंबई दर्शन घडविल्याचे त्यांनी म्हटले. मुंबईत आंदोलकाची ही स्थिती असताना नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी परतलेल्या एका गटाने जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. त्यांच्यासोबत झालेल्या बैठकीचे इतिवृत्त या युवकांना देण्यात आले. राज्य शासनाने आमच्या सर्व मागण्या मान्य केल्याबद्दल सरकारचे त्यांनी आभार मानले. यावेळी राज्याचे अन्न व औषध मंत्री नरहरी झिरवाळ उपस्थित होते. यावेळी प्रशांत गावंडे, लक्ष्मी जाधव, ललितकुमार चौधरी आदी उपस्थित होते. मुंबईत आम्हाला पोलिसांनी ताब्यात घेत वेगवेगळ्या ठिकाणी सोडले. आम्ही एकत्र येवू नये, हा पोलिसांचा त्यामागे हेतू होता. पण आम्ही मंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय येथून हटणार नाही. - सागर पावरा, आंदोलक मुंबई … मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेचे इतिवृत्त आम्हाला मिळाले आहे. त्यांनी आमच्या जवळपास सर्व मागण्या मान्य केल्यामुळे सरकारचे आम्ही आभारी आहोत. -प्रशांत गावंडे, आंदोलक नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com