फोटो : 33399
त्र्यंबकेश्वर : ग्रामपंचायतीला भेट दिल्यानंतर आढावा घेताना सीईओ ओमकार पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ.
...
तीन ग्रामपंचायत अधिकारी निलंबित
सीईओ ओमकार पवार यांचा त्र्यंबकेश्वर दौऱ्यात दणका
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.२३ : कामातील त्रृटी आणि कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तीन ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना निलंबित केले. महादेवनगरचे मुरलीधर गावित, टाकेहर्षचे तुषार राजपूत व देवडोंगरीचे सतीश बच्छाव यांना निलंबनाचा दणका दिला.
सीईओ पवार यांनी शुक्रवारी त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या दौरा केला. यात त्यांना
महादेवनगरचे गावित यांच्यावर ग्रामपंचायतीतील आर्थिक अनियमिततेसह मुख्यालयात अनधिकृतरीत्या अनुपस्थित राहणे, मासिक सभेला गैरहजर राहणे, लेखापरीक्षणासाठी शासकीय दप्तर उपलब्ध न करून देणे आणि कारणे दाखवा नोटिशीला मुदतीत खुलासा सादर न करणे, असे आरोप असल्याचे निदर्शनास आले.
टाकेहर्षचे राजपूत यांच्यावर २६ जानेवारी २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजवंदन न केल्याचा तसेच कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. देवडोंगरीचे बच्छाव यांच्याविरुद्ध १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतील आर्थिक अनियमितता, कारणे दाखवा नोटिशीला वेळेत खुलासा न देणे आणि कर्तव्यात कसूर करणे, या बाबींवरून कारवाई करण्यात आली आहे. निलंबनाच्या कालावधीत संबंधित अधिकाऱ्यांचे मुख्यालय पंचायत समिती, त्र्यंबकेश्वर (मालेगाव) येथे निश्चित करण्यात आले आहे. मुख्यालयी हजर राहणे, नियमानुसार निर्वाह भत्त्यासाठी आवश्यक प्रमाणपत्र सादर करणे आणि ग्रामपंचायतींचा कार्यभार संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडे हस्तांतरित करणे बंधनकारक केले आहे.
पंचायत समितीलाही भेट
मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान पंचायत समिती त्र्यंबकेश्वर येथेही भेट देऊन प्रशासकीय कामकाजाची पाहणी केली. यावेळी गटविकास अधिकारी रविकांत सानप उपस्थित होते. पंचायत समिती स्तरावरून ग्रामपंचायतींच्या कामकाजावर ठेवण्यात येणारे नियंत्रण, विविध विकासकामांची अंमलबजावणी आणि प्रशासकीय यंत्रणेची कार्यक्षमता या अनुषंगाने त्यांनी आढावा घेतला.