टुडे एक : मेन फिचर
समर्पक फोटो वापरावा.
---
साडेसातशेहून अधिक गावे टंचाईच्या छायेत
(उपशीर्षक)
पहिल्या टप्प्यात २५ गावांचा समावेश; पावसाचा मोठा खंड पडल्याचा परिणाम
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ८ : सुरुवातीच्या पावसानंतर पावसाने मोठी दडी मारल्याने पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार केला. त्यात संभाव्य ७५५ गावांचा समावेश असून, पुढील काळात गावांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ऑक्टोबरच्या अखेरपासून टंचाई निवारणासाठी उपाययोजना केल्या आहेत.
यंदा पावसाच्या पडलेल्या दीर्घ खंडाचा परिणाम खरीप पिकांवर झाला. परतीचा पाऊसही समाधानकारक न झाल्याने आगामी उन्हाळ्यात पाणी उपलब्धतेचे आव्हान आणखी वाढण्याची शक्यता आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच शेती आणि पशुधनासाठीही पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात म्हणजे मार्चपासून संभाव्य पाणीटंचाई आराखडा केला जातो. यंदा मात्र ऑक्टोबरपासूनच याचे नियोजन करावे लागले आहे.
पहिल्या टप्प्यातच २५ गावे
जिल्ह्यात दरवर्षी चाळीसगाव, अमळनेर आणि जामनेर तालुक्यांत पाणीटंचाईचे सावट अधिक असते. यंदा मात्र सहा ते सात तालुक्यांत टंचाईची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे. चोपडा, पारोळा, जामनेर, पाचोरा यांसह अन्य तालुक्यांतही पाणीटंचाईचे संकट जाणवू शकते. त्यानुसार टंचाई आराखडा केला जात असून, यात पहिल्या टप्प्यात म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांसाठी २५ गावांचा समावेश आहे; तर जानेवारी ते मार्चमध्ये २६० गावे व एप्रिल ते जूनदरम्यान ४७० गावांना टंचाईचा सामना करावा लागू शकतो.
‘जलजीवन’च्या योजनाही रखडलेल्या
जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर असलेल्या एक हजार ३०० हून अधिक योजनांपैकी अनेक योजनांची कामे निधीअभावी रखडली आहेत. नऊशे योजनांची कामे ५० टक्क्यांपर्यंत झाली असून, काही योजनांची प्रगती ७० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. मात्र, शासनाकडून अपेक्षित निधी वेळेवर व पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने कामांना गती मिळत नसल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेकडून योजनांसाठी निधीची मागणी केली आहे.
इन्फो
टंचाई आराखडा १० ते १२ कोटींपर्यंत
यंदाचा टंचाई आराखडा सुमारे १० ते १२ कोटी रुपयांचा राहण्याची शक्यता आहे. मागील तीन वर्षांत टंचाई आराखड्यातील गावांची संख्या कमी होत होती. गेल्या वर्षी पाच कोटींचा टंचाई आराखडा होता. अधिक पावसामुळे टंचाई न जाणवल्याने साधारण दोन कोटींचा खर्च झाला होता. मात्र, यंदा पावसातील मोठ्या खंडामुळे पुन्हा टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढण्याची चिन्हे असल्याने संभाव्य टंचाई आराखडा १२ कोटींपर्यंत राहण्याची शक्यता असल्याचे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल जाधव यांनी सांगितले.