महिलांच्या आरोग्यच्या
तपासणीसाठी शिबिर
-------------
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.८ : महिलांनी आरोग्याकडे दुर्लक्ष न करता नियमित आरोग्य तपासणी करून घेणे आवश्यक आहे, या उद्देशाने महाकुंभ अभियानांतर्गत उपजिल्हा रुग्णालय, येवला येथे ‘सक्षम नारी आरोग्य कुंभ’ या विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात महिलांसह नागरिकांची विविध प्रकारची आरोग्य तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सल्ला, उपचार व औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
आरोग्य सभापती पारुल गुजराती यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. डॉ. वृषाली पवार यांनी महिलांना विविध आरोग्यविषयक बाबींवर मार्गदर्शन केले. महिलांनी वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घेणे गरजेचे असून, आजाराचे लवकर निदान झाल्यास त्यावर प्रभावी उपचार करणे शक्य होते, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रमाकांत सोनवणे यांनी सांगितले. त्यांनी महिलांना आरोग्य तपासणीचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
शिबिरात सर्वसाधारण आरोग्य तपासणीसह महिला आरोग्य तपासणी, दंत तपासणी, नेत्र तपासणी, बालरोग तपासणी आदी सेवा देण्यात आल्या. रक्तदाब, मधुमेह, रक्त व लघवी तपासणी, क्ष-किरण, विविध प्रयोगशाळा तपासण्या, थुंकी नमुना तपासणी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. गरजेनुसार रुग्णांना औषधांचे वितरण तसेच वैद्यकीय सल्ला व उपचार सेवा देण्यात आली. विद्या रावखंडे यांनी सूत्रसंचालन केले.
----------------