

Hemifacial Spasm Treatment: Symptoms, Causes and MVD Surgery
esakal
डॉ. जयदेव पंचवाघ मेंदू आणि स्पाइन सर्जन
साधारण तीन वर्षांपूर्वी ‘हेमिफेशियल स्पाझम’ या आजाराने त्रस्त असलेल्या ३२ वर्षीय महिलेची आम्ही शस्त्रक्रिया केली. तिथे स्पाझम पूर्णपणे गेले. तिच्या आयुष्यात घडलेली घटना अत्यंत मन हेलावणारी आहे. ही महिला आफ्रिकेतल्या एका तुलनेने प्रगत देशात राहते. ती स्वतः एक उत्तम कलाकार असून ‘स्टेज परफॉर्मन्स’ हा तिच्या नित्य व्यवसायाचा भाग आहे. साधारण १० वर्षांपूर्वी तिला चेहऱ्याच्या उजव्या बाजूचे स्नायू वारंवार आकुंचन पावण्याचा आजार सुरू झाला. आजारात प्रथम एका डोळ्याची अनियंत्रित फडफड सुरू होते. त्याला लोक स्पाझम, आय-ट्विचिंग, डोळ्याची लुकलुक किंवा डोळे फडफडणे अशी अनेक नावं देतात. हा आजार चेहऱ्याच्या एकाच बाजूला सुरू होऊन सर्वसाधारणपणे त्याच बाजूला मर्यादित राहतो. काही दिवसांनी डोळ्याभोवतीची ही अनियंत्रित हालचाल गालावर पसरते आणि चेहऱ्याची ती संपूर्ण बाजू विद्युत वेगाने वारंवार आकुंचन पावू लागते; यालाच ‘हेमिफेशियल स्पाझम’ म्हणतात.