

रत्नागिरीत २ लाख ८९ हजार मतदार बजावणार हक्क
जीवन देसाई ः विधानसभा निवडणूक, ४० लाखांपर्यंत खर्चाची मर्यादा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ ः रत्नागिरी विधानसभा मतदार संघामध्ये २ लाख ८९ हजार ९६४ मतदार असून, त्यामध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे. ८५ वर्षाहून अधिक वय असलेले साडेआठ हजार मतदार आहेत, अशी माहिती रत्नागिरी मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी दिली.
उपविभागीय कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजाराम म्हात्रे, उपविभागीय पोलिस अधिकारी माईणकर उपस्थित होते. या वेळी देसाई म्हणाले, २२ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात होईल. रत्नागिरी मतदार संघात १५ ऑक्टोबरपर्यंत २ लाख ८९ हजार ९६४ मतदार असून, त्यात १ लाख ४१ हजार ५५६ पुरुष तर १ लाख ४८ हजार ३९७ महिला मतदार आहेत. ११ तृतीयपंथी मतदार आहेत. या मतदार संघात ४ हजार ४४० नवमतदार असून, ते प्रथमच मतदान करणार आहेत. ८० वर्षांहून अधिक वयाचे ८ हजार ५१९ मतदार आहेत. सर्वाधिक मतदार हे ४० ते ४९ वयोगटातील आहेत. ८५ वर्षाहून अधिक ३ हजार ७१२ मतदार असून, त्यात १ हजार ४९५ पुरुष तर २ हजार २१७ महिला मतदार आहेत. मतदार संघात १ हजार १८५ दिव्यांग मतदार आहेत तसेच १३ अनिवासी मतदारांचा समावेश आहे.
रत्नागिरी मतदार संघात ३५२ मतदान केंद्रे आहेत. त्यामध्ये शहरात २९ ठिकाणी ६७ मतदान केंद्र तर ग्रामीण भागात २३६ ठिकाणी २८५ मतदान केंद्र आहेत. शहरात गोदूताई जांभेकर महिला विद्यालय हे मॉडेल पोलिंग स्टेशन (मतदान केंद्र) असणार आहे. सर्व महिला कर्मचारी असणारे मतदान केंद्र हे १८५ नंबर नगर पालिका वॉर्ड क्र. ४ व ६ मध्ये असणार आहे. दिव्यांग कर्मचारी असणारे मतदान केंद्र खेडशी येथे असून, तरुण कर्मचारी असणारे केंद्र नाचणे येथे असेल, अशी माहिती देसाई यांनी दिली.
-------
नऊ भरारी पथके
मतदार संघासाठी ३६ झोनल अधिकारी असून, ५ राखीव असे ४१ अधिकारी आहेत. या मतदार संघात ९ भरारी पथके आहेत. ३ व्हिडिओ भरारी पथके भाट्ये, गावखडी, हातखंबा, उक्षी, करबुडे फाटा व वाटद-खंडाळा या ठिकाणी तैनात करण्यात येणार असल्याचे प्रांत देसाई यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.