

३७०८७
टेरवमधील कोळसा भट्ट्यांवर छापा
३० पोती कोळसा जप्त : ग्रामस्थांच्या लढ्याला यश
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ७ : दोन महिन्यांपूर्वी तालुक्यातील टेरव ग्रामस्थांनी कोळसा भट्ट्यांवरून आक्रमक भूमिका घेतली होती. ग्रामस्थांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे वन विभागास टेरव येथील जंगलात धुमसणाऱ्या कोसळा भट्ट्यांवर छापा टाकणे भाग पडले होते. त्यांनतर मंगळवारी पुन्हा वन विभागाने या गावात मोहीम राबविली. यामध्ये एका ठिकाणाहून ३० पोती कोळसा जप्त केला. या कारवाईमुळे कोळसा भट्टीवाल्यांचे पुन्हा एकदा धाबे दणाणले आहेत.
टेरव येथील जंगलात अनेक महिने कोळसा भट्ट्या धगधगत असल्याची तक्रार येत होती. दरवर्षी पावसाळ्यानंतर या जंगलात कोळसा भट्ट्या लावल्या जातात. त्यामुळे गावातील काही जागरूक नागरिकांनी या विरोधात आवाज उठविला होता. वन विभागाला लेखी निवेदन देत संबंधितांवर कारवाईची मागणी केली होती. निवेदन दिल्यानंतरही त्याकडे कानाडोळा केला जात होता. मात्र, ग्रामस्थ कारवाई होण्यासाठी ठाम होते. त्यानुसार वन विभागाने नोव्हेंबरमध्ये टेरव येथील जंगलामध्ये कोळसा भट्ट्यांवर छापा टाकला होता. टेरव येथील संतोष कदम, बाबूराव कदम आणि नागेश कदम या तिघांवर गुन्हा दाखल केला होता. तसेच त्यांच्याकडून ४७ घनमीटर लाकूड जप्त केले होते.
कोळसा भट्टी लावण्यास बंदी असतानादेखील कोळसा भट्ट्या लावल्याप्रकरणी बाबूराव कदम व नागेश कदम यांच्यावर याआधीच गुन्हे दाखल झाले आहेत. असे असताना अजूनही टेरव येथे सातत्याने कोळसा भट्ट्या धगधगत आहेत. याबाबतची माहिती मिळताच येथील परिक्षेत्र वन अधिकारी खान यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी पुन्हा कारवाई केली. यामध्ये ३० पोती कोळसा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई उशिरापर्यंत सुरू होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.