इंधनटंचाई भट्टीवाल्यांच्या पथ्थ्यावर

इंधनटंचाई भट्टीवाल्यांच्या पथ्थ्यावर
Published on

कोळशाच्या भट्ट्या धगधगू लागल्या
टेरव भागात जाळ अन् धूर; हॉटेलमध्ये चुलीवरचे जेवण, जंगलतोडीची भीती
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ७ ः युद्धाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र इंधन टंचाई सुरू असताना कोळसा शेगड्या, चुली यांना मात्र ऊत आला आहे. अनेक हॉटेलमध्ये चुलीवरचे जेवण सुरू झाले असून, त्याला कोळशाचा तडका दिला जात आहे. यामुळे कोळसा भट्ट्या धगधगू लागल्या आहेत. तालुक्यातील टेरव भागात भट्ट्या जोरात आहेत. त्यामुळे ही इंधनटंचाई भट्टीवाल्यांच्या पथ्थ्यावर पडली आहे.
कोकणात लाकूडभट्टी लावण्यास कायद्याने बंदी आहे; मात्र अलीकडे बंदी तिथे चांदी असाच रिवाज पडला आहे. गुटखाबंदी, गावठी दारूबंदी, गांजा चरस बंदी, प्लास्टिक पिशवी बंदी अशा अनेक प्रकारच्या बंदी शासनाने लादल्या आहेत; मात्र या बंदी झुगारून छुप्यापद्धतीने अवैध प्रकार सुरू आहेत. त्याच पद्धतीने कोळसा भट्टी बंदीचादेखील फज्जा उडाला आहे. चिपळूण शहरापासून जवळ असणाऱ्या डोंगरभागातील टेरव येथे अनेक कोळसा भट्ट्या धगधगू लागल्या आहेत. सकाळच्या वेळेला किंवा रात्री मुंबई-गोवा महामार्गावरून येता-जाता येथील भट्टीचा धूर ज्वाळा दृष्टीसदेखील पडतो.
येथील काही भट्टी व्यावसायिक टेरव परिसरातील जंगलातील लाकूड तोडतात आणि भट्टीसाठी ते वापरतात. त्यातून तयार होणारा कोळसा जिल्हाभरातील हॉटेल व्यावसायिक तंदूर भट्टीवाले आदी ठिकाणी विकला जातो. टेरवमधील कोळसा सिंधुदुर्ग ते गोवापर्यंत विकला जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कोळसा भट्टीसाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असल्याचे पुढे येत आहे. वनविभाग दरवर्षी एकदा तकलादू कारवाई करते व पुन्हा नव्याने या भट्ट्या धगधगतात. वर्षानुवर्षे हा प्रकार सुरू असून, वनविभागाला आळा घालण्यास अपयश आल्याचे स्पष्ट होत आहे.
----------------------
चौकट
तक्रार दिली तर कारवाई
कोळसा भट्टीबाबत परिक्षेत्र वनाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता परिक्षेत्र वनाधिकारी सरवर खान यांनी टेरव येथे कोळसा भट्टी सुरू असल्याचा इन्कार केला. कोळसा भट्टी सुरू असल्याबाबत ग्रामस्थांनी तक्रार केल्यास त्यावर कारवाई करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
---
चौकट
टेरव भागात येथे आहेत भट्ट्या?
* लिंगेश्वर मंदिर परिसर
* दत्तवाडी रोड, देवशेत परिसर
* टेरव बुद्रुक वराडी
* राधाकृष्णवाडी मंदिर परिसर
* वेतकोंड गावपरिसर

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com