दिल, दोस्ती : मैत्री जिवाभावाची! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chaya kadam and milind shinde

‘झुंड’, ‘कोण प्रवीण तांबे’, ‘गंगुबाई काठियावाडी’, ‘सिंघम रिटर्न्स’, ‘नाय वरणभात लोन्चा’, ‘सोयरीक’ यांसारख्या अलीकडच्या मराठी, हिंदी चित्रपटांमधल्या जोरदार भूमिकांमुळे अभिनेत्री छाया कदम चर्चेत आहे.

दिल, दोस्ती : मैत्री जिवाभावाची!

- छाया कदम, मिलिंद शिंदे

‘झुंड’, ‘कोण प्रवीण तांबे’, ‘गंगुबाई काठियावाडी’, ‘सिंघम रिटर्न्स’, ‘नाय वरणभात लोन्चा’, ‘सोयरीक’ यांसारख्या अलीकडच्या मराठी, हिंदी चित्रपटांमधल्या जोरदार भूमिकांमुळे अभिनेत्री छाया कदम चर्चेत आहे. आता तिचा ‘येरे येरे पावसा’ हा मराठी चित्रपट येत आहे. या चित्रपटात छाया कदमसोबत हरहुन्नरी अभिनेता मिलिंद शिंदेही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. पडद्यावर एकत्र दिसणारी ही जोडी खऱ्या आयुष्यात देखील खूप चांगले मित्र आहेत. मिलिंद आणि छाया एकमेकांना २००६पासून ओळखतात. त्यांच्या मैत्रीला १६ वर्षांचा काळ उलटून असून, आजही त्यांचे नाते तेवढेच घट्ट आणि आपुलकीचे आहे.

छाया कदम म्हणाल्या, ‘तुझ्याविना’ या मालिकेच्या सेटवर मी मिलिंदला पहिल्यांदाच भेटले. या मालिकेमध्ये माझा एक छोटा रोल होता. यामध्ये मिलिंद देखील काम करत होता. त्याला सेटवर भेटण्याआधी त्याच्या कामाबद्दल खूप काही ऐकलं असल्यामुळं मला दडपण होतं. मग वामन केंद्रे यांच्या एका नाटकात आम्ही एकत्र काम केलं, तेव्हा आम्ही एकमेकांना जास्त ओळखायला लागलो. त्यानंतर तो कलाकार आणि माणूस म्हणून मला उलगडत गेला. कलाकार म्हणून मिलिंद अतिशय प्रगल्भ आहे आणि व्यक्ती म्हणून तो अतिशय हळवा आहे. त्याने नेहमीच मला प्रोत्साहन दिले आहे. त्याच्यामध्ये फायटिंग स्पिरीट खूप जास्त आहे. माझ्यासाठी तो खूप मोठा कलाकार आहे. तो नेहमीच उत्तम अभिनय करतो. मला त्याच्यासारखं काम करायला आवडेल. त्याचं वाचन देखील खूप कमाल आहे. त्याचा प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास आहे. त्याच्या एवढे हुशार आणि अभिनयाला झोकून देऊन काम करणे हे मी स्वतःमध्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न करेन.

प्रामाणिकपणे काम करणे आणि नॉनव्हेज खाणे या दोन्ही गोष्टी आमच्या दोघांमध्ये एकसारख्या आहेत. त्याने ‘झुलवा’ या नाटकातील परश्याची भूमिका आणि ‘बाबू बँड बाजा’ या चित्रपटातील भूमिका मला फार आवडली आहे. आम्ही आमच्या आयुष्यात एकत्र अनेक चढउतार पाहिले आहेत. आता येणाऱ्या ‘ये रे ये रे पावसा’ या चित्रपटात मी जुबेदा नावचे पात्र साकारत आहे. काही चित्रपटांचा आशय प्रेक्षकांना जगण्याचे लढण्याचे बळ देत असतो. हा चित्रपट याच पठडीतला आहे. या चित्रपटात मिलिंद शिंदे माझ्यासोबत मोहम्मद या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. आनंदी आणि सुखी असण्यासाठी आपल्याला खूप गोष्टींची गरज नसते. अतिशय छोट्या गोष्टींमध्ये देखील आपण सुखी राहू शकतो ही गोष्ट मला या भूमिकेतून शिकता आली.’

मिलिंद शिंदेने सांगितले, ‘बऱ्याचदा व्यक्तींना पाहिल्यावर असे वाटते, की या व्यक्तीसोबत आपली मैत्री होऊ शकते त्यापैकी छाया एक होती. छायाच्या बाबतीत मला स्वतःहून तिच्या पुढे मैत्रीचा हात करण्याची इच्छा झाली होती. आमची मैत्री एवढे वर्ष टिकेल, असे वाटले नव्हते. छाया नेहमीच कोणाच्याही मदतीला धावून जाते. तिला कोणालाही मदत करायला आवडते. समोरची व्यक्ती श्रीमंत आहे की गरीब, याचा विचार ती करत नाही. ती अतिशय खरी आहे आणि अतिशय पारदर्शक आहे. एखादी व्यक्ती चुकत असल्यास ती नेहमीच त्याला योग्य सल्ला देऊन चुकीची जाणीव करून देते. दिलखुलास, मनमिळाऊ, प्रत्येकाला आपलेसे करणारा असा तिचा स्वभाव आहे. आम्ही दोघेही अतिशय विरुद्ध स्वभावाचे आहोत आणि दोन्ही विरुद्ध गोष्टी एकत्र येतात तसेच आमच्या दोघांचे विरुद्ध स्वभाव एकत्र येऊन आमची घट्ट मैत्री झाली आहे. छायाने केलेल्या प्रत्येक भूमिका मला मनापासून आवडल्या. मात्र तिने ‘न्यूड’ या चित्रपटात केलेले काम अतिशय कौतुकास्पद आहे. आमची ही जिवाभावाची दोस्ती आम्ही कायम अशीच टिकवून ठेवू.

(शब्दांकन - जान्हवी वंजारे)

Web Title: Chaya Kadam And Milind Shinde Friendship Entertainment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Entertainment
go to top