एथर एनर्जीने कर्मचाऱ्यांना
दिले १.१४ लाख शेअर
---
‘ईएसओपी २०२५’ अंतर्गत वाटप, पेड-अप शेअर भांडवल ३९.६७ कोटींवर
---
सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर, ता. ५ ः इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक एथर एनर्जी लिमिटेडने पात्र कर्मचाऱ्यांना ‘एथर एनर्जी ईएसओपी २०२५ प्लॅन’अंतर्गत १ लाख १४ हजार ३५० इक्विटी शेअरचे वाटप केले आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने गुरुवारी (ता. एक) ठरावाद्वारे या वाटपास मंजुरी दिली. या संदर्भातील माहिती कंपनीने राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजाराला दिली आहे.
या योजनेअंतर्गत स्टॉक ऑप्शनचा वापर केलेल्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक रुपया दर्शनी मूल्य असलेले हे शेअर देण्यात आले. नव्याने वाटप केलेले शेअर कंपनीच्या विद्यमान इक्विटी शेअरप्रमाणेच सर्व बाबतींत समकक्ष असतील. सेबीच्या सूचीबद्धता नियमांनुसार आवश्यक तपशीलही कंपनीने शेअर बाजारांना सादर केले आहेत. त्यानुसार हे वाटप ईएसओपीअंतर्गत असून, एकूण १ लाख १४ हजार ३५० इक्विटी शेअर्स जारी करण्यात आले आहेत. कंपनीच्या कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी पूजा अगरवाल यांनी शेअर बाजारांना याबाबतची माहिती दिली आहे.
---
भांडवलात १.१४ लाखांची वाढ
या शेअरच्या वाटपामुळे एथर एनर्जीचे पेडअप शेअर भांडवल ३९ कोटी ६६ लाख ३ हजार ७५१ रुपयांवरून ३९ कोटी ६७ लाख १८ हजार १०१ रुपयांवर पोचले आहे. कंपनीच्या एकूण इक्विटी शेअर्सची संख्या ३९ कोटी ६६ लाख ३ हजार ७५१ वरून ३९ कोटी ६७ लाख १८ हजार १०१ झाली आहे.