भैरवनाथ मंदिरातून
देवाचा मुकुट चोरला
धाराशिव, ता. ४ : परंडा तालुक्यातील कंडारी येथील प्रसिद्ध श्री भैरवनाथ मंदिराच्या गाभाऱ्याचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी मंदिरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह देवाचा पितळी मुकुट चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आंबी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंडारी येथील श्री भैरवनाथ मंदिरात ३० सप्टेंबरच्या रात्री १० वाजता ते १ ऑक्टोबरच्या पहाटे पाचच्या दरम्यान ही चोरीची घटना घडली. चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेत मंदिराच्या गाभाऱ्याचे कुलूप व कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी देवाला परिधान केलेले सुमारे ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचा हार आणि देवाचा पितळी मुकुट असा एकूण ८१ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून पोबारा केला.
पहाटेच्या वेळी मंदिराचे पुजारी तथा सेवाधारी विलास जगन्नाथ क्षीरसागर (वय ६० वर्षे, रा. कंडारी, ता. परंडा) हे मंदिरात आले असता, गाभाऱ्याचा दरवाजा तुटलेला दिसला. आत जाऊन पाहिले असता देवाचे दागिने व मुकुट गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती ग्रामस्थ व पोलिसांना दिली. या प्रकरणी पुजारी विलास क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून आंबी पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. ३) गुन्हा नोंद करण्यात आला आहे.