गणेश मंडळांच्या सामाजिक कार्याचा गौरव
ढोकीच्या कामगार गणेश मंडळाला तालुक्यात पहिले पारितोषिक
धाराशिव, ता. ९ (बातमीदार) : गणेशोत्सवात काँग्रेसच्या जिल्हा व शहर शाखेच्या वतीने आयोजित उत्कृष्ट गणेश मंडळ आणि गौरी सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. स्पर्धेतील विजेत्या गणेश मंडळांचा काँग्रेस भवन येथे आयोजित विशेष सन्मान सोहळ्यात गौरव करण्यात आला.
काँग्रेसचे अध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर, ज्येष्ठ नेते विश्वास शिंदे, राजेंद्र शेरखाने, धनंजय राऊत आणि प्रशांत पाटील यांच्या हस्ते विजेत्या मंडळांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. स्पर्धेत सहभागी सर्व मंडळांना स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. धाराशिव शहरस्तरीय उत्कृष्ट गणेश मंडळ स्पर्धेत विजय चौक तरुण गणेश मंडळाने प्रथम, श्री बाल हनुमान गणेश मंडळ (गवळी गल्ली) यांनी द्वितीय, तर हिंगळजमाता गणेश मंडळाने तृतीय क्रमांक मिळविला. छत्रपती संभाजी चौक गणेश मंडळ आणि श्री समर्थ राजा गणेश मंडळाने उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविले.
तालुकास्तरीय स्पर्धेत ढोकी येथील कामगार गणेश मंडळाने प्रथम, कोंड येथील शिवभक्त गणेश मंडळाने द्वितीय, तर अंबेजवळगा येथील साठे तरुण गणेश मंडळाने तृतीय क्रमांक मिळविला.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा, सामाजिक बांधिलकी आणि समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या मंडळांच्या कार्याचे यावेळी कौतुक करण्यात आले. भविष्यातही मंडळांनी असे उपक्रम सुरू ठेवावेत, असे आवाहन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी, गणेश मंडळांचे कार्यकर्ते आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.