ABD26J80754
सेनगाव ः पानकनेरगाव जि.प. शाळेत स्वच्छतागृहास लावलेले कुलूप.
-----------------------
पानकनेरगाव जि.प. शाळेत
नव्या स्वच्छतागृहास कुलूप
विद्यार्थ्यांची कुचंबणा; आरोग्याशी खेळ
सेनगाव, ता.५ (बातमीदार) : तालुक्यातील पानकनेरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी नवीन स्वच्छतागृह बांधण्यात आले. मात्र, काम होऊनही या स्वच्छतागृहास कुलूप लावून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची कुचंबणा होत असून, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याने पालकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सेनगाव तालुक्यातील पानकनेरगावसह काही जिल्हा परिषद शाळांत विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहांचे बांधकाम करण्यात आले. हे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ते तातडीने विद्यार्थ्यांच्या वापरासाठी खुले करणे अपेक्षित होते. पण, प्रत्यक्षात चित्र वेगळेच आहे. संबंधित बांधकाम कंत्राटदाराचे स्वच्छतागृहाचे शासकीय देयके बाकी असल्याने, त्याने थेट स्वच्छतागृहास कुलूप ठोकल्याची माहिती समोर आली आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांना नाहक स्वच्छतागृह कुलूपबंद ठेवल्याने गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. असे केल्याने कंत्राटदाराचे पैसे तत्काळ मिळतील का? असा सवाल पालकवर्गातून विचारला जात आहे. प्रशासनाकडून निधी मिळवण्यासाठी अशाप्रकारे विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांवर टाच आणण्याऐवजी, कंत्राटदाराने प्रशासनाकडे स्वतः पाठपुरावा करणे गरजेचे असतानाही ही गैरसोय विद्यार्थ्यांवर लादली जात आहे. संबंधित प्रशासनाने या प्रकारची गंभीर दखल घेऊन कुलूपबंद स्वच्छतागृह तत्काळ विद्यार्थ्यांच्या वापरासाठी खुले करावे, अशी मागणी पालकांकडून होत आहे.