सेवाभावी संस्थांचा मदतीसाठी नांदेडमध्ये पुढाकार

file photo
file photo

नांदेड - कोरोनाच्या विषाणूपासून बचाव करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने ता. १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे अनेक गोरगरिब आणि हातावरचे पोट असणाऱ्यांना रोजगारापासून वंचित रहावे लागले आहे. त्यामुळे अशांना मदत करण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था, संघटना, पक्षांसह नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. गरजू लोकांना नाष्टा, जेवणासह धान्याचे किट देण्यात येत आहे. त्याचबरोबर रक्तदान शिबिरही घेण्यात येत आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब आणि गरजू नागरिकांना अन्न मिळावे, या उद्देशाने येथील धार्मिक संस्था गुरुद्वारा तख्त सचखंड बोर्ड, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, आपत्ती निवारण सेवा समिती, लॉयन्स क्लब, भारतीय जनता पक्ष, कॉँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना, गोदाश्रद्धा सेवा समूह, रयत सेवाभावी संस्था, रयत सेवाभावी संस्था, नांदेड जिम्नॅस्टिक असोसिएशन आदींनी पुढाकार घेत मदत करण्यास सुरुवात केली आहे. 

विविध भागात गरजूंना भोजन
मुख्य सचखंड गुरुद्वारा, लॉयन्स क्लब, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, आपत्ती निवारण कक्ष आदींच्या मदतीने शहरातील विविध भागातील गरजूंना भोजन देण्यात येत आहे. गुरुद्वारा तख्त सचखंड बोर्डातर्फे गरजूंसाठी अविरतपणे लंगर सेवा सुरु ठेवली आहे. बोर्डाच्या वतीने विविध भागात नागरिकांना अन्न वाटप करण्यात येत आहे. गुरुद्वारा बोर्डाच्या या समाज सेवा उपक्रमात सेवाभावी नागरिकांची ही चांगली साथ मदत मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. लॉयन्स क्लबतर्फे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व आपत्ती निवारण कक्षातर्फे भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे. 

भाजपातर्फे वृत्तपत्र विक्रेत्यांना मदत
आपला जीव धोक्यात घालून वृत्तपत्र वितरीत करणाऱ्या मुलांना भाजपाच्या स्थापना दिवसानिमित्त धान्य वाटप करण्यात आले. यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, भाजपा महानगराध्यक्ष प्रविण साले, व्यंकट मोगले, सुनिल उबाळे, विनायक सगर, वृत्तपत्र वितरण संघटनेचे बालाजी पवार आदींची उपस्थित होती. साईबाबा मंदिर, चैतन्यनगर येथे वृत्तपत्र वितरण करणाऱ्या ५० मुलांना धान्य वाटप करण्यात आले. भाजपा स्थापना दिवसानिमित्त दररोज वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येणार असून दररोज ५० गरजु व्यक्तींना धान्य वाटप करण्यात येणार आहे. यानिमित्ताने पोर्णिमानगर येथे भाजपा महानगराध्यक्ष प्रविण साले व व्यंकट मोगले यांच्या हस्ते गरजवंतांना धान्य वाटप करण्यात आले.

गरजूंना धान्याचे किट, भोजन
सिडको भागात गोरगरिबांना निराधार कुटुंबांना धान्य वितरण करण्यात येत आहे. आतापर्यंत ३० किट वाटप करण्यात आल्या आहेत. दानशूर व्यक्तींनी सहकार्य करून या कार्यास हातभार लावावा, असे आवाहन सेवा समूहाचे मार्गदर्शक गजानन जोशी यांनी केले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर बोंबीलवार, प्रशांत पेंडकर, गिरीष मोरे, सोनू ठाकूर, संजय कंधारे, शुभम बोंबीलवार, बालाजी सिरसाट आदी परिश्रम घेत आहेत. मुखेड येथेही ज्यांचे हातावर पोट आहे अशा लोकांच्या उदरनिर्वाहासाठी तसेच दिवस रात्र जनतेची सेवा करणारे पोलीस बांधव, रुग्णालयातील रुग्णांची सेवा करणारे कर्मचारी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व आपत्ती निवारण सेवा समितीच्या वतीने दररोज मोफत डबे पुरवठा करण्यात येत आहेत.

रक्तदान शिबिरासाठी पुढाकार
रयत सेवाभावी संस्था व नांदेड जिम्नॅस्टिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महारक्तदान शिबीरचे आयोजन करण्यात आले. गरीब ,गरजू जणांना रक्ताची आवश्यकता असते. त्यामुळे ता. ११ एप्रिलपर्यंत महारक्तदान शिबीराचे आयोजित करण्यात आले आहे. डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालय व जीवन आधार ब्लड बँक यांनी सेवा दिली. 

   
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com