Laborers traveling by tractor for sugarcane harvesting
sakal
- संतोष निकम
कन्नड - तालुक्यात पावसाने उघडीप दिल्याला तब्बल शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. पावसाअभावी मका, सोयाबीन, कापूस व तूर ही खरीप पिके पूर्णपणे वाळून गेली आहेत. रब्बी हंगामासाठीही पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने त्यावर संकट ओढवले आहे. त्यामुळे शेतीतील कामे ठप्प झाली असून, मोलमजुरी व रोजंदारीवर संसाराचा गाडा चालविणाऱ्या कुटुंबांसमोर रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी, तालुक्यातील गाव, तांडे, वाड्या-वस्त्यांमधून ऊसतोडीसाठी जाणाऱ्या मजुरांची संख्या वाढली असून, ऊसतोडणीसाठी गाड्या बांधण्याची लगबग सुरू झाली आहे.