

नारंगी येथे मंगलमूर्ती जेष्ठी यात्रा उत्साहात
पोयनाड (बातमीदार) : अलिबाग तालुक्यातील नारंगी येथे श्री मंगलमूर्ती जेष्ठी यात्रा नुकतीच पार पडली. चिंचवड देवस्थान ट्रस्ट, चिंचवड- पुणे यांच्या वतीने या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. गुरूवार २९ मे रोजी चिंचवड येथून मोरया गोसावी गणपतीचे नारंगी येथे आगमन झाले. याप्रसंगी मोरया गोसावी गणपतीची ग्रामप्रदक्षिणा पार पडली. यावेळी गणेश हनुमान मंदिरात मूर्तीची स्थापना करून आरती करण्यात आली. शुक्रवारी विनायकी चतुर्थीच्या दिवशी पूजा, श्री गणपती अथर्वशीर्ष आवर्तन, विविध धार्मिक कार्यक्रम, धुपारती पार पडली. शनिवारी श्रींची पूजा व धार्मिक कार्यक्रम झाला. त्यानंतर दुपारी महाप्रसादानंतर मोरया गोसावी गणपतीचे नारंगी येथून चिंचवडसाठी प्रस्थान झाले. या मंगलमूर्ती जेष्ठी सोहळ्यासाठी आणि श्री मोरया गोसावी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी नारंगी, हाशिवरे व पेढांबे परिसरातील भक्तांनी मोठी गर्दी केली होती.
..................
डॉ. आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे मेजर भगत यांचा सत्कार
माणगाव (बातमीदार) ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे येथील एनसीसी अधिकारी मेजर मिलिंद भगत यांना एनसीसी महासंचालक यांच्याकडून “ऑन-द-स्पॉट डीजी कमेंडेशन कार्ड” देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र संचालनालयात पार पडलेल्या विशेष सत्कार समारंभात डीजी एनसीसी यांच्या हस्ते त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून निवड झालेल्या एकमेव एएनओ म्हणून मेजर भगत यांना हा सन्मान प्राप्त झाला आहे. त्यांच्या अनुकरणीय कार्याबद्दल आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रनिष्ठा, शिस्त व सेवाभाव रुजवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची अधिकृत पातळीवर दखल घेण्यात आली. त्यांच्या कार्याची दखल घेत, डीजी एनसीसी यांनी त्यांचे कौतुक करत भविष्यातही उत्तम कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यशाच्या या टप्प्यावर मेजर भगत यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. त्यांच्या या यशामुळे विद्यापीठासह राज्यातील इतर एनसीसी युनिट्सना प्रेरणा मिळाली आहे.
..................
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय उपाययोजना करण्याची मागणी
अलिबाग (वार्ताहर) ः पावसाळ्याच्या सुरुवातीला ग्रामीण भागात सर्पदंश व इतर विषारी प्राण्यांच्या दंशाच्या घटना वाढत आहेत. त्याचप्रमाणे साथीचे आजारही बळावत आहेत. या पार्श्वभूमीवर, उपकेंद्रात २४ तास वैद्यकीय अधिकारी आणि आवश्यक औषधांची उपलब्धता करण्याच्या मागणीसाठी शेकापच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेतली. या वेळी शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत, तालुकाध्यक्ष विक्रांत नंदकुमार वार्डे, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रमोद घासे व संजय माळी, युवक उपाध्यक्ष अॅड. पुनीत पाटील, अतुल पाटील, मस्जिद कुर, शशिकांत ठाकूर, अक्षय डिकले आणि यश पाटील हे पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनात, उपकेंद्रे व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये २४ तास वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असावेत, सर्पदंशावरील इंजेक्शन आणि इतर आवश्यक औषधांचा पुरेसा साठा राखावा, ग्रामीण भागात जनजागृती मोहिमा राबवाव्यात, आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ रुग्णवाहिका सेवा मिळण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी. तालुक्यात यापूर्वी अशा घटनांमध्ये वेळेवर उपचार न मिळाल्याने दुर्दैवी मृत्यू झाले आहेत. त्यामुळे यंदा ही परिस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा मागण्या शेकापकडून करण्यात आल्या आहेत. या निवेदनानंतर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मागण्यांचा गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन दिले.
........
पेणमधील काथोडचा धबधबा ठरतोय पर्यटकांचे आकर्षण
पेण, ता. ३१ (बातमीदार) ः डोंगरदऱ्यातून कोसळणारे पांढरे शुभ्र पाणी अंगावर झेलण्यासाठी येथील काथोडच्या धबधब्याकडे पर्यटकांचे पावले मोठ्या प्रमाणात वळत आहे. सध्या हे ठिकाण पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरत आहे.
रायगड जिल्ह्यातील हा धबधबा पेणपासून १३ किलोमीटर अंतरावर सातेरी या डोंगराळ व दुर्गम भागात आहे. सातेरी आदिवासी वाडीजवळील उंच डोंगरावरून कोसळणाऱ्या धबधब्यातील पाणी अंगावर झेलण्यासाठी गेल्या काही वर्षापासून पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. येथे आदिवासी वायर कातकरी बांधवांची वस्ती असल्यामुळे या धबधब्याला कापूर या नावाने ओळखले जाते. डोंगरावरील हिरवीगार झाडे तसेच डोंगर कपारीतून निघणारे धुके, असे विहंगम दृश्य येथे दिसतात. त्यातच डोंगरावरून खळखळत मोठ्या डौलाने पडणारा हा धबधबा डोळ्याचे पारणे फेडतो. त्यामुळे विकेंड साजरा करण्यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल परिसरातील अनेक पर्यटक येथे हजेरी लावतात. उंचावरून कोसळणारे पाण्याचे तुषार अंगावर घेत जंगल भेजनाचा आनंद मोठ्या प्रमाणात पर्यटक लूटतात. मात्र अतिउत्साही पर्यटकांच्या वागणुकीमुळे येथे अपघाताची परिस्थिती उद्भभवू नये, म्हणून प्रशासनाकडून सुरक्षिततेचे फलक उभारण्यात आले आहे. मात्र तरीदेखील काही पर्यटकांकडून धुडगूस घातला जात असल्याने येथील वन्यप्राण्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सुरक्षिततेसाठी पोलिस यंत्रणा कार्यरत करण्यात यावी, अशी मागणी जागरूक पर्यटकांकडून करण्यात येत आहे.
....................
कर्जतच्या महिलांचा स्तुत्य उपक्रम
कर्जत (बातमीदार) ः कर्जत येथील ज्येष्ठ महिलांनी एकत्र येत ‘स्वामीनी ज्येष्ठ महिला संघ’ ही संघटना स्थापन केली आहे. गेली २० वर्षे या संघटनेमार्फत सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवले जात आहेत. ९५ महिलांची सदस्यसंख्या असलेल्या या संघटनेत महिलांचे एकोप्याने कार्य सुरू आहे. शनिवारी दहिवली येथील विठ्ठल मंदिरात आयोजित कार्यक्रमात ''आगमे फॅशन'' व्यवसायाच्या प्रमुख अश्विनी राहुल दाभणे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या अनुभवातून महिलांना व्यवसायाची सुरुवात कशी करावी, अडचणींवर मात कशी करावी आणि यशस्वी होण्यासाठी काय करावे, याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या संवादातून महिलांना नवा उत्साह व स्फूर्ती मिळाली. या संघटनेच्या माध्यमातून दरवर्षी श्रावण महिना, दिवाळी आणि वर्षभरातील विविध सण-उत्सव, सांस्कृतिक व प्रेरणादायी कार्यक्रम घेण्यात येतात. या कार्यक्रमांमधून महिलांमध्ये आत्मविश्वास, उद्योजकतेची भावना आणि सामाजिक भान निर्माण करण्याचे काम सातत्याने केले जाते. या उपक्रमशील संघटनेच्या अध्यक्ष शिल्पा गुजराथी, सचिव प्रणाली जोशी आणि खजिनदार सरला पाटील या महिलांनी संघटनेची धुरा समर्थपणे सांभाळली आहे. संघटनेत सर्व महिला सहभागी होऊन प्रत्येक कार्यक्रम यशस्वी करत आहेत. ‘स्वामींनी ज्येष्ठ महिला संघ’ ही संघटना महिलांना एकत्र आणून त्यांच्या कलागुणांना, उपक्रमशीलतेला आणि आत्मविश्वासाला बळकटी देण्याचे काम करते. सामाजिक जाणिवा, परंपरांचे जतन, आणि आधुनिकतेची जोड या सर्वांचा सुंदर मिलाफ या कार्यक्रमांमध्ये दिसतो.
..........
रायगड मेडिकल असोसिएशनतर्फे आरोग्य शिबिर
कर्जत (बातमीदार) ः जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त रायगड मेडिकल असोसिएशन, लार्सन अँड टुब्रो फाउंडेशन, कोतवाल वाडी ट्रस्ट व सद्भाव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला डॉ. आशुतोष कुळकर्णी, डॉ. प्रशांत गांगल (सचिव), डॉ. कुमार ओसवाल (कोषाध्यक्ष), डॉ. दिलीप सावळे (संपादक), डॉ. संजय भामेरे (वरिष्ठ फिजिशियन, एल अँड टी), तसेच डॉ. शर्वाणी कुळकर्णी (स्त्रीरोगतज्ज्ञ, कर्जत) यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. शर्वाणी कुळकर्णी यांनी उपस्थित महिलांना मासिक पाळीविषयीच्या गैरसमजुती, स्वच्छतेचे महत्त्व आणि पर्यावरणपूरक सॅनिटरी नॅपकिन्सच्या विल्हेवाटीकरणाविषयी मार्गदर्शन केले. या शिबिरात १०० पेक्षा अधिक महिलांनी सहभाग घेतला. यावेळी हिमोग्लोबिन आणि साखरेची तपासणी, तसेच सॅनिटरी नॅपकिन्स आणि औषधांचे मोफत वाटप करण्यात आले.
.............
कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवशींय जनावरांची सुटका
खालापूर टोल नाक्यावर पोलिसांची कारवाई; ८० जनावरे जप्त
खालापूर, ता. ३१ (बातमीदार) ः कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवशींय जनावरांची येथील सावरली टोल नाक्यावर पोलिसांकडून सुटका करण्यात आली आहे. यावेळी ८० गुरे जप्त करण्यात आली आहेत.
चार टेम्पोमधून या गुरांना पुण्याहून कल्याणला नेले जात होते. मात्र गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे खालापूर पोलिसांनी ही कारवाई केली.
शुक्रवारी ३० मे रोजी सकाळी पुण्यातील काही जागरूक नागरिकांनी खालापूर तालुक्यातील गोरक्षकांशी संपर्क साधून चार टेम्पोंमधून गुरांची वाहतूक होत असल्याचे सांगितले. तसेच या जनावरांना कत्तलीसाठी नेते जात असल्याची माहितीही देण्यात आली. मिळालेल्या माहितीच्या आधारे गोरक्षकांसह खालापूर पोलिसांनी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर सावरली टोल नाक्यावर सापळा लावला. यावेळी संबंधित वर्णन दिलेल्या वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये चार टेम्पोंमधून तब्बल ८० गुरे कत्तलीसाठी कल्याणला नेले जात होते. यामध्ये म्हैस आणि रेडकू यांचा समावेश होता. याबाबत खालापूर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
.................
बेकायदा गुरांची वाहतूक होत असल्याचे समोर आले आहे. यावेळी दाटीवाटीने टेम्पोमध्ये गुरे भरण्यात आली होती. याबाबत गुन्हा दाखल झाला असून गुरांची व्यवस्था गोशाळेत करण्यात आली आहे. -सचिन पवार, पोलिस निरीक्षक, खालापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.