

वाहतूक पोलिसांच्या शर्टावर आता बॉडी वोर्न कॅमेरा
तात्या लांडगे
सोलापूर : वाहतूक पोलिसांच्या खिशावर आता बॉडी वॉर्न कॅमेरे असणार असून त्यामध्ये आवाजाचेही रेकॉर्डिंग होणार आहे. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांना वाहतूक पोलिसांशी सौजन्याने वागावे लागणार आहे. वाहतूक पोलिसांशी हुज्जत घातल्यास किंवा अरेरावी केल्यास संबंधित वाहनचालकाविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.
सोलापूर शहराचे तत्कालीन पोलिस आयुक्त हरीष बैजल यांनी वाहतूक पोलिसांसाठी ५० बॉडी वॉर्न कॅमेरे घेतले होते. मात्र, काही महिन्यांतच त्यांचा वापर बंद झाला. दरम्यान, अक्कलकोट रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ वाहतूक अंमलदाराने दुचाकीस्वारास दमदाटी, शिवीगाळ करून मारहाणीची भाषा वापरल्याचा व्हिडिओ राज्यभर व्हायरल झाला होता. त्यानंतर वाहतूक शाखेचे नूतन सहायक पोलिस आयुक्त मनोज यादव यांनी पाच वर्षांपूर्वीचे बॉडी वॉर्न कॅमेरे वाहतूक अंमलदारांना देण्याचा निर्णय घेतला.
उत्तर व दक्षिण विभागाकडील प्रत्येकी २५ अंमलदारांना हे कॅमेरे देण्यात आले. मात्र, त्यातील बहुतेक कॅमेरे बंद पडलेले आहेत. आता संबंधित कंपनीच्या अभियंत्यांकडून कॅमेरे दुरुस्त केले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बॉडी वॉर्न कॅमेऱ्यांमुळे वाहतूक पोलिस व वाहनचालकांमधील नेमका संवाद वरिष्ठ अधिकाऱ्यांना ऐकता येणार आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांवरील आरोप खरे की खोटे, याची वस्तुस्थिती समजण्यास मदत होणार आहे.
...तर त्या वाहनचालकावर दाखल होईल गुन्हा
वाहतूक नियमन करणे, अपघात होऊ नयेत, अपघातात कोणाचा जीव जाऊ नये, यासाठी वाहतूक पोलिस काम करत असतात. सर्व वाहनचालकांनी वाहतूक नियम पाळल्यास आमचे वाहतूक अंमलदार कोणावरही कारवाई करणार नाहीत. वाहनचालकांनी आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवावीत. मात्र, कारवाईवेळी कोणी हुज्जत घातली किंवा अरेरावी केली, तर त्या वाहनचालकावर गुन्हा दाखल होऊ शकतो.
- मनोज यादव, सहायक पोलिस आयुक्त, सोलापूर शहर
६० जणांकडे ई-चालान मशीन
सोलापूर शहरात दक्षिण व उत्तर असे दोन वाहतूक विभाग आहेत. दोन्ही विभागांतील प्रत्येकी ३० हवालदारांकडे ई-चालान मशीन देण्यात आली आहे. बेशिस्त वाहनचालकांवर या मशीनद्वारे दंडात्मक कारवाई केली जाते. त्यांच्याकडेच आता बॉडी वॉर्न कॅमेरे असणार आहेत. ई-चालान मशीन असलेल्या वाहतूक अंमलदारांनाच बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचे अधिकार आहेत. त्यांना शक्यतो रोखीने दंड न घेण्याचे आदेश आहेत. रोखीने दंड घेतल्यास त्याची रीतसर पावती देणे बंधनकारक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.