लग्न व्‍यवस्‍थेसंदर्भातील आचारसंहितेचे पालन करा काळेवाडीतील सकल मराठा समाजाच्या बैठकीत आवाहन

लग्न व्‍यवस्‍थेसंदर्भातील आचारसंहितेचे पालन करा 
काळेवाडीतील सकल मराठा समाजाच्या बैठकीत आवाहन
Published on

पिंपरी, ता. १ : लग्न समारंभातील अतिरिक्‍त खर्च टाळा, महिलांचा छळ करणाऱ्या कुटुंबाशी रोटी बेटी व्‍यवहार करणार नाही, साधेपणाने लग्नाला प्राधान्‍य द्या, यासह समाज बांधवांनी तयार केलेल्‍या आचारसंहितेचे पालन करा, असे आवाहन सकल मराठा समाजाच्‍यावतीने करण्यात आले.
पिंपरी चिंचवड शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने काळेवाडीत बैठकीचे आयोजन केले होते. वैष्णवी हगवणेबाबत घडलेल्या दुर्घटनेचे देशभर पडसाद उमटले. या घटनेमुळे मराठा समाजाबद्दल उलट सुलट चर्चा सुरु आहे. त्यामुळे पुणे शहरातील सकल मराठा समाजाने लग्न व्यवस्थेसंदर्भात एकत्र बैठक घेऊन काही अटी व नियम लागू केलेले आहेत. या वेळी प्रमुख आयोजकांनी समाज बांधवांना आवाहन केले.
या वेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, सुरेश भोईर, नाना काटे, मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राजेंद्र कोंढरे, महाराष्ट्र राज्य कुंभार समाजाचे प्रमुख सतीश दरेकर, भानुप्रताप बर्गे, राजेंद्र कुंजीर, सतीश काळे, सचिन आडेकर, अनिल तागडे, सचिन कोंडे, सचिन साठे, अतुल शितोळे, एन. बी. भोंडवे, मधुकर चिंचवडे, धोंडीबा भोंडवे आदींनी मनोगत व्यक्त केले.

बैठकीच्या सुरवातीला वैष्णवी हगवणे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या बैठकीत समाजाची भविष्यातील वाटचाल व त्यासंदर्भात काही नियम व धोरणे निर्धारित करण्यात आली आहेत. लग्न व्यवस्था व इतर कार्यक्रम व समारंभ याबाबतीत आचारसंहिता घालून देण्यात आली. सभेचे प्रास्ताविक भाऊसाहेब भोईर यांनी केले. नाना शिवले यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत शितोळे यांनी आचारसंहितेचे वाचन करून आभार मानले.

बैठकीतील ठराव -
- मुलांच्या लग्नापूर्वी त्यांच्याशी आईवडिलांचा खुलेपणाने संवाद होणे आवश्यक आहे. यासाठी तसे वातावरण कुटुंबात तयार करणे ही आई वडिलांनी खबरदारी घ्यावी.
- लग्न वेळेवर लावावीत.
- महिलांचा छळ होणाऱ्या कुटुंबाशी रोटी-बेटी व्यवहार नाही.
- सत्कार समारंभ थोडक्यात व्हावेत.
- मिरवणुकांना आवर घालावा.
- स्वागत समारंभाला प्राधान्य द्यावे.
- अनावश्यक खर्च टाळावेत. लग्न साधेपणाने व्हायला पाहिजे.
- स्वागत व आशीर्वाद एकेकच व्हावेत.
- औक्षण करताना सुवासिनींची व गंध लावताना मान्यवरांची संख्या मर्यादित असावी.
- मुलींच्या संसारामध्ये आई वडिलांचा हस्तक्षेप नसावा.
- मुलीवर अन्याय होत असेल तर मुलीच्या पाठीशी सर्वांनी उभे राहावे.
- दशक्रिया विधी / अंत्यविधी याबाबत श्रद्धांजली एक ग्रामस्थ / एक मान्यवर असावे.
- देणगी पाकिटे पुकारताना मर्यादा असावी.

फोटोः 19207

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com