

Generation Gap and Family Relationships
esakal
प्रवीण टोकेकर - pravintokekar@gmail.com
एखाद्याला व्यवहार कशाशी खातात, हे समजत नाही. काही जणांना प्रेम कसं करतात, हेही कळत नाही. तरी त्यांचे संसार नेटके होतात. संसाराच्या वेलीवर एक या दो फुले उमलतात. नोकरी चांगली प्लास्टिकच्या पिशवीसारखी टिकून राहते. दिवाळीच्या सुमारास बोनस मिळतो. एखाद-दोनदा हरिद्वार-ऋषिकेश टूर होते किंवा आगऱ्याच्या ताजमहाल तळहातावर घेतलेला ट्रिक फोटोही काढून होतो. सगळं काही साग्रसंगीत पार पडतं. कालपर्यंत बाब्या या संबोधनापलिकडे न गेलेला गृहस्थ चांगला पिकून बाबासाहेब होतो. लग्नाच्या मांडवात बाबासाहेबांना साष्टांग नमस्कार घडतात. त्याने बाबासाहेबांमध्ये अजुनी दडून असलेला बाब्या संकोचतो. एवढं होऊनही या बाब्याला व्यवहार कशाशी खातात, हे आयुष्यभर कधीही समजलेलं नसतं. प्रेमफ्रिम कशाला म्हणतात हेही ठाऊक नसलं तरी त्याला दोनेक मुलं झालेली असतात. हा बाब्या ऊर्फ बाबासाहेब डोक्यानं जरा ‘हाच’ आहे, हे त्याच्याच जोडीदारणीचं मत असतं आणि अनेक कौटुंबिक व्यासपीठांवर तिनं ते अनेकदा स्वच्छपणे मांडलेलं असतं. आम्ही या बाबासाहेब गटातले!
बाब्याचा संसार सुखाचा झाला. बाब्या आहे आमच्यासारखाच, बेबी बूमर्स किंवा नंतरचा, जनरेशन एक्सवाला. म्हणजे आता साठीबिठीत येऊ घातलेला. किमान पन्नाशी ओलांडणारा. त्याला आपल्याच ‘जेन झी’ पोरांचं नेमकं काय चाललंय याची टोटल धडशी लागलेली नाही. पोरांना काही अक्कल नाही, असं तो अधूनमधून म्हणतो, पण त्यांचं मोबाईल वापरण्याचं कसब बघून रोजच्या रोज आपल्या फोनमधली ग्यालरी साफसूफ ठेवण्याचा सावधपणाही तो बाळगतो. स्वत:ला चांगला ग्राहक म्हणून ओळखणाऱ्या बाब्याला आता ‘बेस्ट डील’ म्हणजे काय आणि ‘ग्रेट डील’ म्हणजे काय, हे थोडं थोडं कळायला लागलं आहे.