

Parag Parikh Flexi Cap Fund Performance
esakal
वसंत कुलकर्णी- vasant@vasantkulkarni.com
दीर्घकालीन कामगिरी, गुंतवणुकीतील शिस्त आणि बाजारातील घसरणीच्या काळात तुलनेने कमी अस्थिरता यांमुळे पराग पारीख फ्लेक्सी कॅप फंडाने गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला आहे. मात्र, अलीकडच्या काळात या फंडाच्या परताव्यात झालेली घसरण आणि वाढलेली मालमत्ता यांमुळे त्याच्या भविष्यातील कामगिरीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. सध्याच्या परिस्थितीत या फंडातील गुंतवणूक कायम ठेवावी का, या प्रश्नाचा घेतलेला वेध.
पराग पारीख फ्लेक्सी कॅप फंडाची सुरुवात २४ मे २०१३ रोजी झाली. या फंडात गुंतवणुकीची शिफारस आम्ही तीन वर्षांनंतर, म्हणजे जुलै २०१५ पासून करायला सुरुवात केली. तेव्हापासून गेली ११ वर्षे हा फंड आमच्या शिफारसींचा आणि आदर्श पोर्टफोलिओचा भाग राहिला आहे. राजीव ठक्कर याचे मुख्य गुंतवणूक अधिकारी आहेत. सध्या हा फंड चर्चेत आहे. गेल्या १३ वर्षांत सर्वांत मोठा सक्रियपणे व्यवस्थापित (ॲक्टिव्हली मॅनेज्ड) केला जाणारा इक्विटी म्युच्युअल फंड म्हणून त्याने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. मात्र, अलीकडच्या काळात त्याच्या कामगिरीत काहीशी घसरण झाली आहे. गेल्या वर्षभरात या फंडाने ५.११ टक्के नुकसान नोंदवले आहे, तर याच काळात ‘निफ्टी ५०० टीआरआय’मध्ये ३.४५ टक्के घसरण झाली आहे. फंडाची एकूण मालमत्ता १.४७ लाख कोटी रुपयांवर पोहोचलेली असतानाच ही परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे एक जुना प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. फंडाचा आकार प्रचंड वाढल्यामुळे त्याला यापुढे पूर्वी इतका परतावा देऊ शकणार नाही, असे मानणारा एक वर्ग समाजमाध्यमांवर दिसतो. या पार्श्वभूमीवर, फंडाची कामगिरी पुन्हा सुधारेल का आणि त्यातील गुंतवणूक कायम ठेवणे योग्य ठरेल का, याचा आढावा घेऊ.