

फोटो : विजयराज डोंगरे, अतुल पवार, उमेश पाटील
-------------------------
राष्ट्रवादीतील गटनेत्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
जिल्हा परिषद; नाव गटनेत्याचे, डाव स्वीकृतचा
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १५ : जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे ११ सदस्य विजयी झाले आहेत. या सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे गटनोंदणी केली आहे. गटनोंदणी करताना राष्ट्रवादीतील दोन गटांचे वारंवार दर्शन होऊ लागले आहे. एका गटाने विजयराज डोंगरे यांची निवड झाल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. दुसऱ्या गटाने अतुल पवार यांची निवड झाल्याचे पत्र दिले आहे. आमचे गटनेते अतुल पवार हेच असल्याचे पत्र जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या स्वाक्षरीने शनिवारी (ता. ९) जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीकडून विजयी झालेल्या ११ सदस्यांमध्ये ४ सदस्य आमदार अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली विजयी झाले आहेत. ४ सदस्य माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विजयी झाले आहेत. मोहोळमधील विजयराज डोंगरे, सांगोल्यातील अतुल पवार व माळशिरसमधील सुषमा नारनवर हे तीन सदस्य राष्ट्रवादीकडून, पण स्वतःच्या ताकदीवर विजयी झाले आहेत. सुषमा नारनवर यांनी कोणत्याही गटात पूर्वीपासूनच सहभाग घेतलेला नाही. उर्वरित दहा सदस्यांच्या पत्रावरूनच गटनेत्याचा विषय वारंवार समोर येत आहे.
दहा सदस्यांच्या मागे एक स्वीकृत सदस्य नियुक्त केला जाणार आहे. यासाठी ग्रामविकास विभागाचे राजपत्र प्रसिद्ध झाले आहे. महिना अखेरपर्यंत स्वीकृत सदस्य निवडीची प्रक्रिया पूर्ण केली जाण्याची शक्यता आहे. स्वीकृत सदस्य निवडीत गटनेत्याने दिलेल्या नावावर स्वीकृत सदस्याची निवड निश्चित मानली जाणार आहे. त्यामुळे गटनेत्याला अधिक महत्त्व आहे. विजयराज डोंगरे हे माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत. तर अतुल पवार हे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचे निकटवर्तीय आहेत. आपला गटनेता असावा यासाठी राष्ट्रवादीतील दोन गट सक्रिय झाले आहेत.
-----------------------
अंतिम निर्णय कोणाचा?
जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या निवासस्थानी शनिवारी (ता. ९) राष्ट्रवादीच्या १० सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत गटनेता म्हणून पवार यांची निवड झाल्याचे सांगत गटनेता बदलाचा शेवटचा पत्रव्यवहार राष्ट्रवादीने ९ मे रोजी केला आहे. गटनोंदणीसाठी दिलेली मुदतवाढ शनिवारी (ता. ९) संपली आहे. राष्ट्रवादीचा गटनेता कोण, याचा फैसला कोण करणार? जिल्हाधिकारी की त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष? याबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. येत्या काळात हा प्रश्न आणखी तीव्रतेने पुढे येण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.