पुण्याला मुसळधार पावसाचा इशारा

पुण्याला मुसळधार पावसाचा इशारा

पुणे, ता. १० : पुणेकरांनो, शहराजवळच्या घाटमाथ्यावर सोमवारी (ता. १०) मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ हवामान खात्याने रविवारी दिला.
कोकणासह, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनच्या पावसाने जोर धरला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर सोमवारी मुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट,’ तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, जिल्ह्यांसह पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ हवामान विभागाने वर्तविला आहे.
मराठवाडा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती तयार झाली आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण भागात वाऱ्यांचे पूर्व-पश्चिम जोडक्षेत्र सक्रिय आहे. कोकणासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा जोर वाढू लागला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांत अनेक ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. उर्वरित राज्यात ढगाळ हवामान आणि उकाडा कायम आहे. दुपारनंतर मेघगर्जनेसह पाऊस हजेरी लावत आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. सोमवारी कोकणातील सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जिल्ह्यात मुसळधार, तर कोकणासह पुणे व सातारा जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा आहे. तर, उर्वरित राज्यात वादळी वारे, विजांसह पूर्वमोसमी पावसाचा इशारा कायम असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

पुण्यात पावसाची विश्रांती
पुण्याला शनिवारी मुसळधार पावसाने झोडपल्यानंतर रविवारी सुटीच्या दिवशी पावसाने विश्रांती घेतली. शिवाजीनगर येथे संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत पावसाची नोंद झाली नव्हती. मात्र, वातावरण ढगाळ होते. आद्रतेचे प्रमाणही वाढलेले होते. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा ५ अंश सेल्सिअसने कमी होऊन २९.२ अंश सेल्सिअस नोंदला. पुण्यात १ ते ९ जून या दरम्यान पुण्यात २०९.२ मिलिमीटर पाऊस पडला. या दरम्यान, पुण्यात ४९.७ मिलिमीटर पाऊस पडतो. या सरासरीच्या तुलनेत १५९.५ मिलिमीटर जास्त पावसाची नोंद झाली.

मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) :
कोल्हापूर

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :
पुणे, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
मुंबई, पालघर, नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com