

Poorna Movie Review
esakal
सुहास किर्लोस्कर - suhass.kirloskar@gmail.com
शाळेत उपस्थिती वाढण्यासाठी जेवण द्यावे लागत असेल, तर तो शालेय शिक्षणव्यवस्थेचा पराभव आहे. अशा विपरीत परिस्थितीमध्ये पूर्णा आणि तिला पाठिंबा देणारे प्रवीणकुमार हेच आशेचा किरण आहेत, ज्यांनी पणती लावून अंधार कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. हा चित्रपट प्रत्येक शाळेत दाखवला गेला तर शिक्षक - पालक आणि विद्यार्थी सर्वांचेच डोळे उघडतील.
कोणत्याही चित्रपटाच्या सुरुवातीला पाच मिनिटांत काय दाखवले, यावरून त्या चित्रपटाची पारख करता येते. उत्तम दिग्दर्शक पहिल्याच फ्रेममध्ये काय दाखवायचे यावर विचार करतात आणि ते विचार दिसल्यावर चित्रपटात पुढे काय वाढून ठेवले असेल, याची झलक दिसते. पांढऱ्या रंगाच्या धुक्यातून म्हणजेच वाऱ्यावर स्वार झालेल्या ढगातून आपल्याला एव्हरेस्टचे दर्शन घडते. बर्फाळ प्रदेशात काही तंबू दिसतात याचा अर्थ तिथे काही जण वास्तव्य करत आहेत. तेवढ्यात तिथे उतारावरून खाली येणारे बर्फ दिसते, त्याला हिमस्खलन (snow avalanche) म्हणतात. अशा कोसळणाऱ्या बर्फातून एकदम पडद्यावर अंधार दिसतो. आपल्या मनात शंकेची पाल चुकचुकत आणि पडद्यावर अक्षरे उमटतात - पूर्णा.