फोटो - NSK26H31636
नाशिक : स्तनाच्या कर्करोगावरील आधुनिक उपचार आणि उपचारक्रमावर आयोजित आंतरराष्ट्रीय प्रगत अभ्यासक्रमात विविध देशांतील डॉक्टरांसमवेत नाशिकचे कर्करोगतज्ज्ञ डॉ. मुकुल घरोटे.
स्तनाच्या कर्करोगावर दीर्घकाळ
नियंत्रण शक्य : डॉ. घरोटे
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.७ : स्तनाचा कर्करोग असलेल्या रुग्णाला योग्य वेळी, योग्य उपचार आणि योग्य क्रमाने देणे ही आधुनिक उपचारांची दिशा असून त्याद्वारे या आजारावर दीर्घकाळ नियंत्रण शक्य आहे, असे मत कर्करोगतज्ज्ञ डॉ. मुकुल घरोटे यांनी नोंदविले. तसेच स्तनात गाठ, आकारात बदल, त्वचा किंवा स्तनाग्रातील बदल जाणवल्यास तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
मेटास्टॅटिक अर्थात शरीराच्या अन्य भागांत पसरलेल्या स्तनाच्या कर्करोगावरील आधुनिक उपचार आणि उपचारक्रमावर आयोजित आंतरराष्ट्रीय प्रगत अभ्यासक्रमात नाशिकचे कर्करोगतज्ज्ञ डॉ. मुकुल घरोटे यांनी निमंत्रित म्हणून सहभाग घेतला. या वेळी जगभरातील कर्करोगतज्ज्ञांनी रुग्णानुसार उपचारांची निवड व योग्य उपचार नियोजनावर चर्चा केली. जगातील स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णभारापैकी सुमारे निम्मा भार आशिया खंडावर असून, भारतासह अनेक देशांत निदान उशिरा होते. त्यामुळे लवकर निदान आणि वेळेत उपचार आवश्यक आहेत. गेल्या काही वर्षांत लक्ष्यित औषधे, संप्रेरकाविरोधी उपचार आणि रोगप्रतिकारशक्तीवर आधारित उपचारांमुळे मेटास्टॅटिक स्तनाच्या कर्करोगावर दीर्घकाळ नियंत्रण शक्य झाले आहे.