सेकंड मेन
फोटो : H31685
खासदारांच्या अटकेविरोेधात काँग्रेसतर्फे काळा दिवस
आंदोलनातून केंद्र सरकारचा निषेध; जोरदार घोषणाबाजी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ८ : दिल्लीतील जतंरमंतर येथे आंदोलनावेळी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी व इंडिया आघाडीच्या खासदारांना करण्यात आलेल्या अटकेच्या निषेधार्थ शहर काँग्रेसतर्फे गुरुवारी (ता.८) काळा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. शिवाजी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर पक्षातर्फे आंदोलन करताना केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.
केंद्रीय मुख्य निवडणूक आयुुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात काँग्रेसने आंदोलन उभारले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून जंतरमंतर येथे विरोधी पक्षनेते गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीच्या खासदारांनी शांततेच्या मार्गने मोर्चा काढला. पण, बळाचा वापर करून हा मोर्चा अडविण्यात आला. या वेळी बळाचा वापर करताना गांधी यांच्यासह काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार प्रियांका गांधी तसेच इतर ज्येष्ठ नेत्यांशी पोलिसांनी अमानुष वर्तन केले. या घटनेच्या निषेधार्थ पक्षातर्फे शहरात काळा दिवस पाळून आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्रातील सरकारने सर्व मर्यादा ओलांडल्याचा आरोप करण्यात आला. शहराध्यक्ष नीलेश खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आंदोलनात प्रदेश सचिव प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, रमेश जाधव, उल्हास सातभाई, उद्धव पवार, स्वाती जाधव, ज्ञानेश्वर काळे, जयेश पोकळे, वृंदा शेरे, गुड्डी आबा, डाॅ. सुचेता बच्छाव यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
---चौकट
‘ज्ञानेश कुमार राजीनामा द्या’
आंदोलनकर्ते काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या वेळी राजीनामा द्या, राजीनामा द्या ज्ञानेश कुमार राजीनामा द्या, अशी मागणी केली. ज्ञानेश कुमार कहाँ मिंलेगे, बीजेपी के दप्तर मे; वोट चोर कहाँ मिंलेगे, बीजेपी के दप्तर में; वोट चोर, गद्दी छोड; भारतीय संविधानाचा विजय असो; डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो आदी घोषणा दिल्या. या घोषणांनी परिसर दणाणून गेला.