नादुरुस्त मीटरमुळे वीजबिलात वाढ
अडीच ते साडेतीन हजारांचे बिल; मीटर बदलण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
निमगूळ, ता. १४ : येथील गावासह परिसरात अनेक ग्राहकांचे वीजमीटर नादुरुस्त असूनही महावितरणकडून मीटर बदलण्याऐवजी वाढीव वीजबिले पाठविली जात आहेत. नियमित ४०० ते ६०० रुपये वीजबिल येणाऱ्या ग्राहकांना आता अडीच ते साडेतीन हजार रुपयांपर्यंत बिले येत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
परिसरात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या हाती पीक आलेले नाही. अशा परिस्थितीत ऐन सणासुदीच्या काळात वाढीव वीजबिलांचा भार ग्राहकांवर पडत आहे. काही ग्राहकांच्या बिलावर मीटर नादुरुस्त असल्याचा फॉल्टी कोड, तसेच रीडिंग उपलब्ध नसल्याची नोंदही येत आहे. तरीदेखील संबंधित मीटर बदलण्याची कार्यवाही होत नसल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे.
याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, नवीन मीटर बसवून घेतल्यास वीजबिल कमी करण्यात येईल, असे सांगण्यात आले. मात्र, महिनाभर उलटूनही नवीन मीटर बसविण्यात आलेले नाहीत. दोंडाईचा कार्यालयातून वीजबिले तयार होत असल्याने नादुरुस्त मीटरची माहिती प्रशासनाला सहज उपलब्ध होऊ शकते. अशा ग्राहकांची यादी तयार करून वाढीव बिले पाठविण्याऐवजी तातडीने मीटर बदलणे आवश्यक आहे.
महावितरणने नादुरुस्त मीटर तातडीने बदलून वाढीव वीजबिले दुरुस्त करावीत, अशी मागणी निमगूळ परिसरातील ग्राहकांनी केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.