राजकुमार राव, वामिका गब्बी
‘प्रहार’ चित्रपटानिमित्त जळगावात
उज्ज्वल निकम यांचीही उपस्थिती; रविवारी दुचाकी रॅली
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ९ : राज्यसभा खासदार तथा ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘प्रहार’ चित्रपटानिमित्त अभिनेता राजकुमार राव, अभिनेत्री वामिका गब्बी आणि खासदार उज्ज्वल निकम रविवारी (ता. ११) जळगावात येणार आहेत. या वेळी चित्रपटातील कलाकारांशी संवाद साधण्याची संधी जळगावकर रसिकांना मिळणार आहे.
‘प्रहार’ चित्रपटातून उज्ज्वल निकम यांच्या जीवनप्रवासातील विविध पैलू, त्यांचे कार्य आणि न्यायव्यवस्थेतील योगदान उलगडण्यात येणार आहे. या चित्रपटाविषयी चित्रपटप्रेमींमध्ये उत्सुकता असून, प्रमुख कलाकारांच्या जळगाव भेटीमुळे रसिकांना त्यांच्याशी थेट संवाद साधता येणार आहे.
या कार्यक्रमानिमित्त रविवारी सायंकाळी ४.४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून छत्रपती संभाजी नाट्यगृहापर्यंत दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. ‘खासदार उज्ज्वल निकम कार्यक्रम मित्र परिवार समिती’तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन हे समितीचे अध्यक्ष आहेत. समितीच्या प्रमुख सदस्यांमध्ये नंदकुमार बेंडाळे, भरत अमळकर, अनिश शहा, अनिल कांकरिया, युसुफ मकरा, डॉ. रेखा महाजन, डॉ. राजेश पाटील, किरण बच्छाव, प्रकाश पाटील, अमर कुकरेजा, ॲड. भरत देशमुख, रोहित निकम, जितेंद्र लाठी, प्रसाद सूर्यवंशी, राहुल पवार, प्रतीक्षा सोनवणे, विराज कावडिया आणि हर्षल पाटील यांचा समावेश आहे. जळगावकरांसाठी हा विशेष कार्यक्रम खुला असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केले.