धुळे टुडे १ साठी...
---
डंपर- टिप्परमधील माल पूर्णपणे झाकणे बंधनकारक
---
चारुदत्त व्यवहारे; १ एप्रिलपासून नवा नियम लागू; कव्हरिंग यंत्रणेसह अलर्ट सिस्टीमही आवश्यक
---
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २४ : डंपर किंवा टिप्परमधून वाहतूक करताना माल उघडा राहू नये आणि प्रवासादरम्यान कव्हर उघडल्यास चालकाला तत्काळ सूचना मिळावी, यासाठी आता वाहनांमध्ये विशेष सुरक्षा यंत्रणा बसविणे बंधनकारक होणार आहे. केंद्र सरकारच्या सुधारित मोटार वाहन नियमांनुसार १ एप्रिल २०२७ पासून सर्व डंपर व टिप्पर वाहनांना संपूर्ण लोड बॉडी झाकणारी कव्हरिंग यंत्रणा आणि चालकाला सावध करणारी अलर्ट सिस्टीम असणे आवश्यक आहे. धुळे जिल्ह्यातील वाहनधारकांनी मुदतीपूर्वी या दोन्ही यंत्रणा बसवून घ्याव्यात, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चारुदत्त व्यवहारे यांनी केले आहे.
चालकाला मिळणार इशारा
नव्या व्यवस्थेनुसार डंपर व टिप्परची संपूर्ण लोड बॉडी झाकता येईल अशी यंत्रणा बसवावी लागणार आहे. ही यंत्रणा विद्युत, विद्युत-यांत्रिक, हायड्रॉलिक किंवा यांत्रिक पद्धतीची असू शकते. विशेष म्हणजे, वाहतुकीदरम्यान कव्हर उघडे राहिल्यास किंवा असुरक्षित स्थितीत असल्यास चालकाच्या कक्षात आवाज आणि दृश्य संकेतांद्वारे तत्काळ इशारा मिळणार आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम १३८-ब नुसार ही व्यवस्था अनिवार्य करण्यात आल्याचे श्री. व्यवहारे यांनी स्पष्ट केले.
अन्यथा कारवाई
कव्हरिंग यंत्रणेमुळे वाहनाच्या उंचीबाबत संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी नियम ९३ मध्येही तरतूद करण्यात आली असून, ही यंत्रणा वाहनाची एकूण उंची मोजताना विचारात घेतली जाणार नाही. जिल्ह्यातील सर्व डंपर व टिप्पर वाहनधारकांनी १ एप्रिल २०२७ पूर्वी आवश्यक यंत्रणा बसवून नियमांची पूर्तता करावी. मुदतीनंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व्यवहारे यांनी दिला आहे.
---