

India stock market outlook
esakal
जा गतिक पातळीवरील अनिश्चितता, अमेरिका-इराण युद्धाचा परिणाम आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती यांच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात चढ-उतार सुरू आहेत. अशा परिस्थितीत पुढील काळात बाजाराची दिशा कशी असेल, गुंतवणूकदारांनी कोणते धोरण अवलंबावे आणि कोणती क्षेत्रे अधिक आकर्षक ठरू शकतात, यासह विविध मुद्द्यांवर युनियन म्युच्युअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी हर्षद पटवर्धन यांची ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार
वसंत कुलकर्णी यांनी खास ‘सकाळ मनी’साठी घेतलेली मुलाखत...
प्रश्न : अमेरिका-इराण युद्ध सुरू झाल्यापासून शेअर बाजारात सतत चढ-उतार होत आहेत. जागतिक पातळीवर अस्थिरता आहे. या पार्श्वभूमीवर, एकूण जागतिक (मॅक्रो) परिस्थितीकडे आपण कसे पाहता?
पटवर्धन : सर्वप्रथम, हे युद्ध सुरू होण्याआधी म्हणजे फेब्रुवारीच्या सुरुवातीला आम्ही बाजाराबाबत सकारात्मक होतो. कारण मागील १८ महिन्यांत दोन-तीन प्रमुख कारणांमुळे बाजारात निराशा पसरली होती. पहिले कारण म्हणजे अर्निंग्ज ग्रोथचा अभाव. साधारणपणे वार्षिक १२-१४ टक्के वाढ अपेक्षित असते; परंतु गेल्या दोन वर्षांत ही वाढ केवळ पाच ते सहा टक्के इतकीच होती, जी बाजारासाठी अपुरी ठरली. दुसरे कारण म्हणजे ‘एआय’ (Artificial Intelligence) ही गुंतवणुकीची महत्त्वाची थीम. परकी गुंतवणूकदारांच्या दृष्टीने भारतात ‘एआय’ क्षेत्रात पुरेशा संधी नव्हत्या. त्यामुळे त्यांनी कोरिया, तैवान आणि विशेषतः अमेरिकेत अधिक गुंतवणूक केली. तिसरे कारण म्हणजे गेल्या वर्षी जुलै-ऑगस्टमध्ये अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर आणि सेवांवर ५० टक्के आयातशुल्क लावले. या तिन्ही कारणांमुळे भारतीय बाजार जवळजवळ १७-१८ महिने दबावाखाली होता. २०२५ मध्ये, जागतिक पातळीवर उभरत्या अर्थव्यवस्थांनी विकसित अर्थव्यवस्थांपेक्षा चांगली कामगिरी केली. २००८ नंतर प्रथमच असे घडले. मात्र, भारतीय भांडवली बाजार याला अपवाद ठरले. फेब्रुवारीच्या सुरुवातीला काही सकारात्मक घडामोडी झाल्या. डिसेंबर २०२५ तिमाहीत कंपन्यांच्या नफ्यात वाढ झाली, पुढील दोन वर्षांत १५-१६ टक्के अर्निंग्ज ग्रोथची शक्यता निर्माण झाली, भारत-अमेरिका व्यापार करारामुळे आयातशुल्क कमी होण्याची अपेक्षा वाढली आणि ‘एआय’बाबत सकारात्मक दृष्टिकोन तयार झाला. मात्र, २८ फेब्रुवारीला इराणवर हल्ला झाला आणि परिस्थिती पुन्हा बदलली. भारतासाठी कच्च्या तेलाच्या किमती अत्यंत महत्त्वाच्या आहेत, कारण आपण आयातीवर अवलंबून आहोत. तेलाचे दर वाढल्यास महागाई वाढते आणि अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे बाजाराची अशी अवस्था झाली आहे.