

India vs West Indies ODI
esakal
सुनंदन लेले -sdlele3@gmail.com
प्रसंग गोड असून मला त्याची चव कडू लागली. हे वाक्य तुम्हांला विरोधाभासी वाटेल. पण त्याला कारण आहे. ३० सप्टेंबरला गुवाहाटीच्या बर्सापारा मैदानावर एक दिवसीय सामना भारत विरुद्ध वेस्ट इंडीज दरम्यान रंगला. पहिली फलंदाजी करताना विंडीजच्या तीन फलंदाजांनी शतके ठोकली. भारतीय संघासमोर ४०५ धावा उभारल्या. नजरेला दिसणाऱ्या धावांच्या डोंगराला सामान्य टेकडीसारखे पार करताना भारतीय फलंदाजांनी ४३.३ षटकात विजय हाती घेतला. भारतीय संघासाठी हा विक्रमी पाठलाग ठरला. रोहित शर्माने शतक तर कर्णधार शुभमन गिलने नाबाद द्विशतक केले. मालिका जिंकूनही मला त्या विजयाची चव कडू लागली ज्याला कारण होते मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये गोलंदाजांवर होणारा अन्याय.
म्हणून ओरडून सांगावेसे वाटते की मर्यादित षटकांच्या सामन्यातील गोलंदाजांवर होणारा अन्याय थांबवा नाहीतर क्रिकेट मरेल. मी कोणतीही चेष्टा करत नाहीये. टी२० आणि एक दिवसीय सामन्यात जे नियम केले गेले आहेत आणि ज्या प्रकारच्या खेळपट्ट्या तयार केल्या जात आहेत ते बघता गोलंदाज होण्याचे स्वप्न कोणी बघणार नाही. भारत विरुद्ध वेस्ट इंडीज दुसऱ्या एक दिवसीय सामन्यात विंडीजच्या तीन फलंदाजांनी शतके ठोकत ४०० धावांचा डोंगर उभारला. त्या डोंगराला टेकडी समजून भारतीय फलंदाजांनी सहजी पार केले आहे. दिवसाच्या खेळात ८०० पेक्षा जास्त धावा षटकामागे ९ धावांच्या सरासरीने कुटल्या गेल्या. दोनही बाजूचे गोलंदाज फक्त मार खाताना दिसले कारण त्यांना नियमाच्या पिंजऱ्यात डांबले गेले होतेच वर खेळपट्टी फक्त आणि फक्त फलंदाजांचे लाड करत होती.