भुसावळला तरुणाचा खून
---
२५ लाखांच्या व्यवहाराचा वाद; दोन तासांत दोन संशयित जेरबंद
सकाळ वृत्तसेवा
भुसावळ, ता. ८ : शहरातील साक्री फाटा परिसरात २५ वर्षीय तरुणाचा खून करून मृतदेह वरणगाव रस्त्यावरील आलिशान वॉटर पार्कसमोरील सर्व्हिस रस्त्यालगत फेकून दिला. या घटनेचा येथील बाजारपेठ पोलिसांनी अवघ्या दोन तासांत छडा लावला. पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादातून खून झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी संजय दत्तू आवटे व प्रमोद बलराम लाहोरे यांना ताब्यात घेतले आहे. अफसर रफीक मेमन ऊर्फ गुड्डू याचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आले असून, त्याचा शोध सुरू आहे.
बुधवारी (ता. ७) सायंकाळी साक्री फाट्याजवळील एका फार्म हाऊसवर भूषण उल्हास व्हावले याला संजय आवटे व त्याच्यासोबत असलेल्या दोघांनी बोलावून घेतले. पैशांच्या व्यवहारावरून भूषण व संजय यांच्यात वाद झाला. संजयकडून घेतलेले पैसे परत न केल्यावरून भूषण याला मारहाण केली. यात गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. नंतर मृतदेह वरणगाव रोडवरील वॉटर पार्कसमोरील सर्व्हिस रोडवर फेकून दिला. या प्रकरणी भूषणचा भाऊ विशाल उल्हास व्हावले (वय २५) यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी तपास सुरू केला. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी संजय आवटे व प्रमोद लाहोरे यांना जेरबंद केले.