अखेर घटस्फोटाबाबत नाग चैतन्यने सोडलं मौन; म्हणाला "जर समंथा खूश असेल.." | Naga Chaitanya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Samantha, Naga Chaitanya

अखेर घटस्फोटाबाबत नाग चैतन्यने सोडलं मौन; म्हणाला "जर समंथा खूश असेल.."

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध जोडी समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि नाग चैतन्य (Naga Chaitanya) यांच्या घटस्फोटाची चर्चा संपूर्ण कलाविश्वात झाली. घटस्फोटाच्या निर्णयाने समंथा-नाग चैतन्यच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. समंथा याविषयी अनेकदा सोशल मीडियाद्वारे, मुलाखतींमधून व्यक्त झाली. मात्र नाग चैतन्यने मौन बाळगणं पसंत केलं होतं. आता घटस्फोटाच्या तीन महिन्यांनंतर पहिल्यांदाच नाग चैतन्य त्याविषयी व्यक्त झाला आहे. लग्नाच्या चार वर्षांनंतर २ ऑक्टोबर २०२१ रोजी या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांना घटस्फोटाची माहिती दिली होती.

आगामी चित्रपटासाठी प्रमोशन करताना नाग चैतन्य घटस्फोटाविषयी व्यक्त झाला. "आम्ही दोघांनी एकमेकांच्या आनंदासाठी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. यात काही वाईट नाही. जर ती खूश असेल तर मीसुद्धा खूश आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत घटस्फोट हाच निर्णय योग्य वाटतो." घटस्फोटानंतर समंथावर अफेअर्स आणि गर्भपातासारखे गंभीर आरोप करण्यात आले. या ट्रोलिंगला समंथाने वेळोवेळी सडेतोड उत्तर दिलं. "आमच्या घटस्फोटाच्या वृत्ताने चाहते नाराज झाले हे मी मान्य करते, मात्र त्यांची नाराजी व्यक्त करण्याची पद्धत थोडी वेगळी असती तर बरं झालं असतं", असं ती म्हणाली होती.

हेही वाचा: विकी-कतरिनाने साजरी केली लग्नानंतरची पहिली 'लोहरी'

घटस्फोटानंतर समंथाची पोस्ट-

'माझ्या वैयक्तिक संकटामध्ये तुम्ही जी मला भावनिक सहानुभूती दिली, ते पाहून मी खरोखर भारावून गेली आहे. तुम्ही दाखवलेल्या सहानुभूतीबद्दल, काळजीबद्दल आणि खोट्या अफवांपासून माझा बचाव केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानते. ते म्हणतात, माझं अफेअर होतं, मला मूल नको होतं, मी संधीसाधू आहे आणि आता तर मी गर्भपात केला आहे अशीही अफवा पसरली आहे. घटस्फोटाची संपूर्ण प्रक्रिया अत्यंत क्लेशकारक असते. त्यातून बाहेर पडण्यासाठी मला थोडा वेळ द्या. माझ्या खासगी आयुष्यावर होणारे हे शाब्दिक हल्ले अत्यंत वाईट आहेत. पण मी तुम्हाला वचन देते, या गोष्टींमुळे आणि ते जे काही म्हणतील त्याने मी खचून जाणार नाही,' अशी पोस्ट तिने लिहिली होती.

घटस्फोटानंतर समंथा पहिल्यांदाच एका आयटम साँगमध्ये झळकली. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' या चित्रपटातील 'ऊ अंटावा' हे गाणं तिच्यावर चित्रित करण्यात आलं. समंथाच्या संपूर्ण करिअरमधील हा पहिलाच आयटम साँग आहे. ती लवकरच एका आंतरराष्ट्रीय चित्रपटातही भूमिका साकारणार आहे. फिलिप जॉन दिग्दर्शित 'द अरेंजमेंट्स ऑफ लव्ह' यामध्ये ती महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. दुसरीकडे नाग चैतन्य हा 'बंगारराजू' या चित्रपटात त्याचे वडील नागार्जुन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. याशिवाय आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा'मध्येही त्याची भूमिका आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top