मुंबई - 'बैलाची शरीररचना घोड्यासारखी नसली, तरी बैलदेखील धावू शकतो. बैल हा घोड्याच्या वेगाने धावू शकत नसला तरी प्रशिक्षण दिलेला खिलार जातीचा बैल वेगाने धावू शकतो,'' असा अहवाल प्राणी तज्ज्ञ समितीने दिला आहे. त्यामुळे बैलगाडी शर्यतींसमोर असलेला महत्त्वाचा अडथळा पार पडला आहे. सर्वोच्च न्यायालयासमोर राज्य सरकार हा अहवाल सादर करणार असून, घोड्यांच्या शर्यतीप्रमाणे बैलाच्या स्पर्धांना देखील परवानगी मिळावी, असा युक्तिवाद केला जाणार आहे.
राज्यातील बैलगाडी शर्यतीवर उच्च न्यायालयाने आणलेल्या बंदीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती न दिल्याने गेले वर्षभर राज्यात बैलगाडी शर्यत झालेल्या नाहीत. मात्र सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच दिलेल्या एका आदेशात बैल हा शर्यत लावण्यासाठी समर्पक प्राणी नसल्याचा यापूर्वीच निकाल दिलेला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात याबाबतची भूमिका मांडताना बैल हा घोड्यासारखाचा धावणारा प्राणी असल्याचे न्यायालयासमोर सिद्ध करण्याचे राज्य सरकारच्या पशू, दुग्ध व मत्स्य विभागाने स्वीकारून प्राणीविषयक नऊ तज्ज्ञांची समिती काही महिन्यांपूर्वी तयार केली होती. डॉ. डी. एम. चव्हाण, अतिरिक्त आयुक्त पशुपालन यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या या समितीने अहवाल दिला आहे. या समितीमध्ये प्राणी तज्ज्ञ, प्राण्यांचे डॉक्टर, पशुसर्जन, प्राण्यांचे शरीरविज्ञान तज्ज्ञ अशा विविध तज्ज्ञांचा समावेश होता. या समितीने बैलाच्या शरीराबरोबर घोड्याच्या शरीराचाही शास्त्रशुद्ध अभ्यास करून हा अहवाल तयार केला आहे. त्यासाठी अनेक संदर्भ, प्रत्यक्ष पाहणी, तज्ज्ञांशी चर्चेबरोबर तांत्रिक विवेचन यामध्ये करण्यात आले आहे.
या अहवालानुसार परदेशात पूर्वी घोडा शेतीच्या कामासाठीच उपयोगात आणला जायचा. मात्र औद्योगिक क्रांतीनंतर घोड्याऐवजी शेतीसाठी यांत्रिकीकरणाचा वापर सुरू झाल्याने घोडा सार्वत्रिक शर्यतीसाठी वापरला जाऊ लागला. त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
घोडा, बैल, मेंढ्या, हरीण, काळवीटसारख्या प्राणी धावण्यात तरबेज असतात. विशेषत: खूर असणारे प्राणी वेगाने धावतात; पण निश्चितच प्रत्येकाचा धावण्याचा वेग निरिनिराळा असू शकतो. त्यांची तुलना करणे योग्य नाही. बैलांच्या शरीराची रचना, पायांची लांबी आणि पोटाचा घेर यामुळे ते अत्यंत वेगाने धावू शकतात, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. सस्तन प्राणी असल्याने गायीच्या पोटाचा घेर हा बैलापेक्षा अधिक असतो. त्यामुळे गाय बैलाच्या वेगाने धावू शकत नाही.
राज्य सरकारने बैलगाडी शर्यतीसाठी तयार केलेले नियम हेदेखील पुरेसे असल्याचा शेरा या अहवालात मारण्यात आला आहे. प्राण्यांना इजा होत नसल्याची खात्री करून घेतल्यास बैलगाडी शर्यत घेण्यास हरकत नसल्याचे स्पष्टपणे या अहवालात म्हटले आहे.
समितीच्या अहवालातील मुद्दे
- खिलार आणि त्याच्या उपजातीतले बैल हे धावण्यासाठी योग्य
- बैल आणि घोड्याची तुलना करणे योग्य नाही
- सगळ्याच प्राण्यांमध्ये धावण्याचे नैसर्गिक कौशल्य असते
- कोणत्याही प्राण्याला प्रशिक्षणाची गरज असते. प्रशिक्षणाशिवाय बैलही नांगरणी, पेरणीच्या कामात मदत करू शकत नाही.
- घोडा आणि बैल या दोन्ही प्राण्यांना प्रशिक्षण दिल्यानंतरच अपेक्षित कामे करतात.
- बैलाच्या शर्यतींमुळे ग्रामीण भागातील सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था मजबूत होण्यास मदत होते.
- सामान वाहून नेण्यासाठी किंवा धावण्यासाठी बैल व घोडा या प्राण्यांचा वापर होऊ शकतो.
प्राण्यांचा धावण्याचा वेग (प्रतितास मैल)
प्रशिक्षित बैल - 48
कळपातील बैल - 24
गाय - 40
घोडा - 88
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.