solapur आयटी पार्क
तात्या लांडगे
सोलापूर : सोलापुरातील आयटी पार्कसाठी होटगी तलावाजवळील १०० एकर जमीन एक रुपयाचाही मोबदला न घेता ‘एमआयडीसी’ला मोफत देण्याचा निर्णय कृष्णा खोरे विकास मंडळाच्या नियामक मंडळाने घेतला आहे. त्यानुसार पाटबंधारे विभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी मंगळवारी (ता. २२) ती जमीन हस्तांतरित करण्यासंदर्भातील पत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) प्रादेशिक अधिकाऱ्यांना दिले.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्या अध्यक्षतेखालील कृष्णा खोरे विकास मंडळाच्या नियामक मंडळाच्या १२० व्या बैठकीत सोलापूरच्या आयटी पार्कसाठी जमिनीच्या बिनशर्त हस्तांतरणाचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानुसार होटगी तलावाजवळील गट क्र. ५७६ मधील २० हेक्टर जमीन आता जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आयटी पार्कच्या नियोजित प्रकल्पासाठी ‘एमआयडीसी’च्या स्वाधीन करण्यात येणार आहे.
तत्पूर्वी, सोलापूर शहर-जिल्ह्यातील तरुण- तरुणींचे स्थलांतर रोखले जावे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयटी पार्क उभारण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार त्यांच्या वाढदिवशीच सोलापूरकरांना मोठे गिफ्ट मिळाले. नियामक मंडळाने आज (बुधवारी) मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोलापूरच्या पाटबंधारे कार्यालयास जागा विनामोबदला देण्याचा निर्णय घेतल्याचा निरोप दिला. त्यानुसार लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता एस. एस. खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता सचिन पवार यांनी ‘एमआयडीसी’च्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना पत्र पाठवून आयटी पार्कसाठी विनामूल्य जागा देण्याचा निर्णय घेतल्याचे कळविले.
उद्योजकांना २००० रुपये प्रति स्क्वेअर मीटर जागा
होटगी तलावाजवळील जागेवरच आयटी पार्क होणार, हे आता निश्चित झाले आहे. पाटबंधारे विभागाच्या पत्राने आता आयटी पार्कच्या जागेचा संभ्रम दूर झाला आहे. ही जागा विनामोबदला मिळाल्याने आयटी पार्कसाठी इच्छुक उद्योजकांना तेथे २००० रुपये प्रति स्क्वेअर मीटर दराने जागा मिळेल, अशी माहिती ‘एमआयडीसी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
मोजणी, आराखडा तयार करून होतील अंतर्गत कामे
पाटबंधारे विभागाने होटगी तलावाजवळील २० हेक्टर जमीन विनामोबदला हस्तांतरित करण्यासंबंधीचे पत्र आम्हाला दिले आहे. त्यानुसार आता जिल्हाधिकाऱ्यांना कळवून त्यांच्यामार्फत जागा ‘एमआयडीसी’कडे हस्तांतरित होईल. आषाढी वारी संपताच ही प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर जागेची मोजणी होऊन त्याचा आराखडा (ले-आउट) तयार होऊन अंतर्गत कामे केली जातील. त्यानंतर प्लॉट वाटपाची प्रक्रिया सुरू होईल.
- शिवाजी राठोड, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी, सोलापूर
----------------------------------------------------------------
मुख्यमंत्र्यांकडून सोलापूरकरांसाठी मोठे गिफ्ट
पाटबंधारे विभागाची जागा आयटी पार्कसाठी विनामोबदला देण्याचा आदेश म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूरकरांना दिलेले रिटर्न गिफ्टच आहे. सोलापूरकरांचे आयटी पार्कचे स्वप्न आता लवकरच सत्यात उतरणार आहे. सोलापुरातील उच्चशिक्षित तरुणांना सोलापुरातच काम मिळवून देण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात भाजपने दिलेला आणखी एक शब्द पूर्ण केला आहे.
- देवेंद्र कोठे, आमदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.