NEET Admission esakal
महाराष्ट्र बातम्या

‘नीट’ पेपरफुटी प्रकरण! झेडपी शिक्षक जाधव आंतरजिल्हा बदलीनंतर त्याच वर्षात तीनदा दीर्घ रजेवर; गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेत जावून केली चौकशी; शिक्षणाधिकारी म्हणाले, आता...

NEET पेपरफुटीतील मुख्य संशयित संजय तुकाराम जाधव हा 27 जून 2023 रोजी आंतरजिल्हा बदलीतून सिंधुदुर्गवरून सोलापूर जिल्हा परिषदेच्या टाकळी टे. वस्ती शाळेत रुजू झाला. यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून तो शाळेत फिरकलाच नाही. गतवर्षी त्याने रुजू झाल्यानंतरच लगेचच 9 दिवसांची दीर्घ रजा घेतली.

तात्या लांडगे

सोलापूर : ‘नीट’च्या पेपरफुटीतील मुख्य संशयित संजय तुकाराम जाधव हा २७ जून २०२३ रोजी आंतरजिल्हा बदलीतून सिंधुदुर्गवरून सोलापूर जिल्हा परिषदेच्या टाकळी टे. या वस्ती शाळेत रुजू झाला होता. यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून तो शाळेत फिरकलाच नाही. तर गतवर्षी त्याने रुजू झाल्यानंतरच लगेचच नऊ दिवसांची दीर्घ रजा घेतली. त्यानंतर तो दोनदा दीर्घ रजेवर आणि चारवेळा किरकोळ रजेवर गेल्याची बाब समोर आली आहे.

माढा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विकास यादव यांनी मंगळवारी (ता. २५) टाकळी टें. येथील जिल्हा परिषदेच्या वस्ती शाळेवर जाऊन संजय जाधव याच्या उपस्थितीची सखोल चौकशी केली. त्यावेळी शाळेत नियमित हजर होता का, त्याने डमी शिक्षक नेमला होता का, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा व्यवस्थापन समितीचे आजी माजी अध्यक्ष, ग्रामस्थ, विद्यार्थी व मुख्याध्यापकांचे लेखी जबाब घेतले. त्यावेळी तो विनापरवाना रजेवर गेला नसल्याची माहिती सर्वांनीच सांगितली. तत्पूर्वी, गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेतील शिक्षकांचे हजेरी रजिस्टर तपासले. त्यावेळी तो २७ जून ते ५ जुलै, १० जुलै ते १३ जुलै, १८ जुलै ते २८ जुलै या काळात दीर्घ रजेवर गेल्याची नोंद रजिस्टरमध्ये आढळली. तसेच चार वेळा त्याने किरकोळ रजा घेतल्याच्याही नोंदी रजिस्टरमध्ये आहेत, असे गटशिक्षणाधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. हा चौकशी अहवाल प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्याचेही गटशिक्षणाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

खुलाशात मुख्याध्यापक म्हणतात...

संजय जाधव हा शिक्षक २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाची सुरवात झाल्यापासून शाळेत आलाच नाही. त्यासंदर्भात मुख्याध्यापकांनी वरिष्ठांना कळविले नसल्याने गटशिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांना नोटीस बजावून खुलासा मागविला होता. मंगळवारी मुख्याध्यापकांनी खुलासा केला असून त्यात ते लिहितात ‘जाधव यांना वारंवार फोन केले, पण ते कौटुंबिक कारणामुळे दोन दिवसांत येतो असे सांगत होते. त्यानंतर २० जूनला आपण त्यासंदर्भात केंद्रप्रमुखांना सांगितले होते.’

बदलीतील सर्व शिक्षकांच्या प्रमाणपत्राची आता पडताळणी; प्राथमिक शिक्षणाधिकारी

सोलापूर: लातूरमधील ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणी अटकेतील टाकळी टें. (ता. माढा) शाळेवरील जिल्हा परिषदेचा शिक्षक संजय तुकाराम जाधव याची चौकशी सुरू झाली आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही होईल. तसेच ‘संवर्ग- एक’मधून बदली झालेल्या जाधव याच्या पत्नीच्या दिव्यांग प्रमाणपत्राची तपासणी होणार आहे. शिवाय आता ‘संवर्ग- एक’मधून बदली झालेल्या सर्व शिक्षकांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांचीही पडताळणी होईल, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी स्पष्ट केले आहे. ‘नीट’च्या पेपरफुटीतील मुख्य संशयित संजय जाधव (रा. बोथी तांडा, ता. चाकूर, जि. लातूर) याच्याविरोधात लातूरच्या शिवाजीनगर पोलिसांत रविवारी गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी एटीएसने (मंगळवारी) त्याला मंगळवारी (ता. २५) अटक केली आहे. दरम्यान, तो लातूरमध्ये क्लास घ्यायचा. त्यासाठी सहजपणे ये-जा करता यावे म्हणून आंतरजिल्हा बदलीनंतर त्याने वस्तीशाळा निवडली. तेथे स्वत:च्या जागेवर डमी शिक्षक नेमल्याचीही चर्चा आहे. त्याची गंभीर दखल घेऊन प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकारी विकास यादव यांना चौकशी करुन अहवाल देण्याचे सांगितले आहे. मंगळवारी चौकशी अधिकारी दिवसभर टाकळी येथे चौकशी करत होते. विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांकडून शिक्षक जाधव याच्याबाबत माहिती घेत होते. तो अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्याकडे सादर केला जाईल. त्यानंतर पुढील कार्यवाही होईल, असेही शिक्षणाधिकारी शेख म्हणाले. तसेच जाधव याने पत्नीच्या आंतरजिल्हा बदलीसाठी ‘संवर्ग-एक’चा गैरफायदा घेतल्याचेही बोलले जात असून पत्नी दिव्यांग असल्याचे त्याने दिलेल्या प्रमाणपत्राचीही तज्ज्ञांकडून पडताळणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आंतरजिल्हा व जिल्ह्याअंतर्गत ‘संवर्ग- एक’मधून बदली झालेल्या सर्वच शिक्षकांच्या प्रमाणपत्रांचीही तपासणी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

सर्व शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करू

नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेतील शिक्षक संजय जाधव याची चौकशी सुरू आहे. त्याचा अहवाल मिळाल्यानंतर तो मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर होईल आणि पुढील कार्यवाही केली जाईल. आता ‘संवर्ग- एक’अंतर्गत बदली करण्यापूर्वीच प्रमाणपत्रांची तपासणी केली जाईल, असे शिक्षकांना कळविले आहे. त्यानुसार एकदा तपासणी केली आहे. आता पुन्हा जाधव याच्या पत्नीच्या प्रमाणपत्रासह सर्व शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करू.

- कादर शेख, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, सोलापूर

-----------------------------------------------------------------------------------------

अटकेपूर्वी शिक्षण विभागाला कल्पना

शिक्षक संजय जाधव याला अटक करण्यापूर्वी नांदेड एटीएस पथकाने सोलापूर प्राथमिक शिक्षण विभागाला कल्पना दिली. तसेच तपासात सहकार्य करण्याची विनंती केली. त्यावर शिक्षणाधिकारी कादर शेख यांनीही त्यांना सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासित केले आहे. तसेच शिक्षक जाधव हा ४८ तास पोलिस कोठडीत राहिल्यास त्याच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT