आता अनोळखी कॉलही येणार नावासह!
----
देशभरात १ नोव्हेंबरपासून सीएनएपी सेवा; स्वतंत्र नोंदणीची गरज नाही
----
सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर, ता. १५ ः मोबाइलवर अनोळखी क्रमांकावरून फोन आल्यास आता संबंधित व्यक्तीचे नावही दिसणार आहे. एक नोव्हेंबरपासून देशभरातील ४ जी आणि त्या पुढील तंत्रज्ञानाच्या मोबाइल नेटवर्कवर कॉलिंग नेम प्रेझेंटेशन (सीएनएपी) सेवा सुरू करण्याचे निर्देश केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने सर्व दूरसंचार सेवा कंपन्यांना दिले. या सुविधेसाठी मोबाइलधारकांना स्वतंत्रपणे अर्ज किंवा नोंदणी करण्याची आवश्यकता राहणार नाही.
दूरसंचार विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, फोन करणाऱ्याचा मोबाइल क्रमांक आणि त्यासोबत दूरसंचार कंपनीकडे नोंद असलेले नाव दिसेल. संबंधित क्रमांक मोबाइलमध्ये आधीच जतन केलेला असल्यास ग्राहकाने सेव्ह केलेले नावच प्राधान्याने दिसेल. क्रमांक जतन केलेला नसल्यास दूरसंचार कंपनीच्या ग्राहक नोंदणी अभिलेखातील नाव दाखवले जाईल. दूरसंचार विभागाने सुधारित व्याख्या युनिफाइड लायसन्स कराराचा भाग केली असून, करारातील अन्य अटी व शर्ती कायम राहणार असल्याचे आदेशात स्पष्ट केले आहे.
---
परदेशातून आलेल्या कॉलवर ‘इंटरनॅशनल’
परदेशातून येणाऱ्या कॉलसाठी स्क्रीनवर संबंधित व्यक्तीचे नाव दाखवण्याऐवजी ‘इंटरनॅशनल कॉल’ असा उल्लेख दिसेल. शिवाय कॉल करणाऱ्याची ओळख लपविण्यासाठी कॉलिंग लाइन आयडेंटिफिकेशन रिस्ट्रिक्शन (सीएलआयआर) सुविधा घेतलेल्या ग्राहकांचे नाव समोरच्या व्यक्तीला दिसणार नाही.
---
४ जी आणि पुढील नेटवर्कवर सेवा
दूरसंचार विभागाच्या निर्देशानुसार, सर्व सेवा क्षेत्रांमध्ये ४जी आणि त्यापुढील तंत्रज्ञानाच्या मोबाइल नेटवर्कवर ही सुविधा सुरू केली जाणार आहे. दूरसंचार कंपन्यांनी यापूर्वी या सेवेच्या अंमलबजावणीसाठी चाचण्याही केल्या आहेत. मात्र, २ जी आणि ३ जी नेटवर्क तसेच सार्वजनिक दूरध्वनी नेटवर्कवर ही सुविधा सुरू करण्याबाबत स्वतंत्रपणे विचार केला जाणार आहे.
---
तरी सतर्कता गरजेची
या सुविधेमुळे अनोळखी क्रमांकावरून येणाऱ्या कॉलची ओळख पटविणे सोपे होईल. मात्र, स्क्रीनवर नाव दिसले तरी कॉल करणाऱ्याची विश्वासार्हता निश्चित होत नाही. त्यामुळे संशयास्पद कॉल, आर्थिक व्यवहारांसाठी येणारे फोन आणि वैयक्तिक माहिती मागणाऱ्या व्यक्तींबाबत नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.