फार्मर आयडीवर स्वतंत्र शेतकरी
ओळखपत्र बनविण्यास मनाई
सीएससी केंद्रचालकांना कृषी विभागाचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. १८ : ॲग्रिस्टॅक योजनेंतर्गत शेतकऱ्यांना प्राप्त झालेल्या फार्मर आयडीच्या आधारे स्वतंत्र शेतकरी ओळखपत्र तयार करणे, त्याचे वितरण करणे अनधिकृत असल्याचे केंद्र शासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) केंद्रचालकांनी अशा प्रकारे ओळखपत्रे तयार करणे व वितरित करणे तातडीने थांबवावे, असे निर्देश कृषी विभागाने दिले आहेत.
केंद्र शासनाच्या ॲग्रिस्टॅक योजनेंतर्गत शेतकऱ्यांची डिजिटल ओळख निर्माण करण्यासाठी फार्मर आयडी तयार करण्यात येत आहेत. मात्र, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये या आयडीच्या आधारे सीएससी केंद्रांमार्फत स्वतंत्र शेतकरी ओळखपत्रे तयार करून वितरित केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यासंदर्भातील व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत असल्याचेही निदर्शनास आले. या प्रकरणाची दखल घेत केंद्र शासनाने २५ ऑगस्ट २०२४ रोजीच्या पत्राद्वारे फार्मर आयडीच्या आधारे स्वतंत्र ओळखपत्र तयार करणे, त्याचे वितरण करणे अनधिकृत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार राज्यातील सर्व सीएससी केंद्रचालकांना अशा प्रकारची कार्यवाही तातडीने थांबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भविष्यातही फार्मर आयडीच्या आधारे स्वतंत्र शेतकरी ओळखपत्रे तयार करून त्यांचे वितरण करू नये असे निर्देश देण्यात आले आहेत. फार्मर आयडीच्या आधारे स्वतंत्र शेतकरी ओळखपत्र तयार करून देण्याच्या नावाखाली उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या अनधिकृत सेवांपासून शेतकऱ्यांनी सावध राहावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. अशा प्रकारे तयार करण्यात आलेल्या ओळखपत्रांना शासनाची अधिकृत मान्यता असल्याचे गृहीत धरू नये. ॲग्रिस्टॅक योजनेंतर्गत फार्मर आयडीच्या वापराबाबत केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या सूचना व मार्गदर्शक तत्त्वांचे सर्व संबंधितांनी काटेकोरपणे पालन करावे, असेही कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
---------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.