आता घरबसल्या करा
रासायनिक खतांचे बुकिंग
-
एफएफएस प्रणाली लागू झाल्याचा फायदा
-
हिंगोली, ता. २२ : अनुदानित रासायनिक खतांची खरेदी अधिक सुलभ, पारदर्शक आणि नियोजनबद्ध करण्यासाठी केंद्र शासनाने विकसित केलेली फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल (एफएफएस) प्रणाली २२ ऑक्टोबरपासून लागू करण्यात आली. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना जवळच्या खत विक्री केंद्रावरील खतांची उपलब्धता तपासून घरबसल्या मोबाइलद्वारे खतांचे आगाऊ बुकिंग करता येणार आहे.
या प्रणालीअंतर्गत शेतकऱ्यांना गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेल्या एफएफएस मोबाइल ॲपमध्ये शेतकरी ओळख क्रमांक किंवा आधार क्रमांकाच्या आधारे प्रवेश करता येईल. त्यानंतर शेतजमिनीचे क्षेत्र प्रमाणित करून पिकाची निवड करावी लागेल. पिकासाठी शिफारस केलेल्या खतांच्या प्रमाणानुसार किंवा स्वतःच्या गरजेनुसार खतांचे प्रमाण निश्चित करून जवळच्या खत विक्रेत्याकडे उपलब्ध खतांचे बुकिंग करता येईल. बुकिंग केल्यानंतर तीन दिवसांच्या आत संबंधित विक्री केंद्रावर जाऊन बुकिंग क्रमांक दाखवून खत खरेदी करता येईल.
-
उपलब्धता तपासून खरेदीचे नियोजन शक्य
एफएफएस प्रणालीमुळे शेतकऱ्यांना खतांचा उपलब्ध साठा मोबाइलवर पाहता येणार असून, गरजेनुसार खत खरेदीचे नियोजन करता येईल. आगाऊ बुकिंगमुळे खत खरेदीसाठी होणारी धावपळ कमी होण्यास मदत होईल. तसेच अनावश्यक खतांची किंवा इतर कृषी निविष्ठांची खरेदी टाळता येईल. खतांच्या छापील किमतीपेक्षा अधिक दराने विक्री होत असल्यास त्यावर आळा घालण्यास आणि खत विक्री व्यवहारात पारदर्शकता आणण्यासही या प्रणालीची मदत होणार आहे.
----
((कोट))
खतांची खरेदी अधिक सुलभ, पारदर्शक आणि नियोजनबद्ध करण्यासाठी केंद्र शासनाने विकसित केलेली फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल (एफएफएस) प्रणाली २२ ऑक्टोबरपासून लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी तसेच खत विक्रेत्यांनी या पारदर्शक व सुलभ प्रणालीचा अवलंब करावा.
- प्रदीप कच्छवे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.