गेवराईत कर्जदाराला एक महिन्याचा कारावास
गेवराई ः जगदंबा महिला नागरी सहकारी पतसंस्थेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याप्रकरणी शेख समीर शेख रहीम, रा. संजय नगर, गेवराई यांना न्यायालयाने दोषी ठरवले. छत्रपती संभाजीनगर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी क्रमांक १२ सी. एच. कुलकर्णी यांनी शेख समीर यांना एक महिना कारावासाची शिक्षा ठोठावली. ४ लाख ५ हजार ४९१ रुपयांचा दंडही सुनावला. दंडाची रक्कम न भरल्यास आणखी एक महिना कारावास भोगावा लागणार आहे. पतसंस्थेच्या वतीने वसुली अधिकारी भगवान सुखदेव अंतरकर यांनी प्रकरणाचा पाठपुरावा केला. न्यायालयात पतसंस्थेची बाजू ॲड. एस. एस. खैरे यांनी मांडली.
------
‘दुष्काळग्रस्त मेंढपाळांना दिलासा द्या’
बीड ः राज्यात दुष्काळाची परिस्थिती बिकट असून धनगर समाजातील मेंढपाळांना शेळ्या-मेंढ्यांसाठी चारा-पाण्याची मोठी टंचाई भासत आहे. हा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी यशवंत सेना धनगर समाज नेते भारत सोन्नर यांनी केली. या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते आमदार धनंजय मुंडे, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, कृषी मंत्री दत्तामामा भरणे आणि विधान परिषद सभापती राम शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेणार असल्याचे सोन्नर यांनी सांगितले. तसेच, दुष्काळामुळे बेरोजगार तरुण-तरुणींच्या महामंडळांच्या कर्जाची परतफेड अडचणीत आल्याने त्यांचे कर्ज माफ करावे, अशी मागणीही त्यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
---
अश्विनी गिरी यांना शिक्षण महर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार
किल्ले धारूर ः शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल धारूर तालुक्यातील कारी जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका अश्विनी अशोक गिरी यांना मैत्री फाउंडेशन बीड यांच्या वतीने दिला जाणारा २००९ चा राज्यस्तरीय शिक्षण महर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अश्विनी गिरी यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळधारित व कृतीशील अध्यापन, स्वनिर्मित शैक्षणिक साहित्य, तंत्रज्ञानाचा वापर, वाचन चळवळ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धा अशा विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी केली आहे. कोविड काळातील हिरो डॅश मिशनमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग होता.
----
‘महात्मा फुले यांनी सन्मान मिळवून दिला’
बीड ः समाजात स्त्री व शूद्रांना सन्मानाने जगता यावे यासाठी ज्योतिबा फुले यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. उपेक्षितांसाठी शिक्षणाची दारे खुली केली, स्त्री शिक्षणाचा पुढाकार करून मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून क्रांती घडवली आहे. एवढेच नाही तर समाजातील पुरुषसत्ताक कुटुंब व्यवस्थेवर प्रहार केला, असे मत प्रा. सुशीला मोराळे यांनी व्यक्त केले. जय किसान माध्यमिक विद्यालय, वाचेबाभूळगाव (ता. केज) येथे महात्मा जोतिबा फुले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
------
दांडिया महोत्सवात बक्षीस वितरण सोहळा
माजलगाव ः शहरातील झेंडा चौक, जुना तहसील रोड येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ च्या मैदानावर युवा सेनेतर्फे नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित दांडिया महोत्सवाचा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. प्रथम पारितोषिक शिवकन्या हळवे यांना शिलाई मशीन देण्यात आले. द्वितीय पारितोषिक शीला साखरे यांना पैंजण जोडी देण्यात आली. तृतीय पारितोषिक राधा आनलमंडे यांना मल्टी कढई देण्यात आली. उत्तेजनार्थ पारितोषिक सविता खरात यांना देण्यात आले. कार्यक्रमाला शिवसेना तालुकाप्रमुख तुकाराम बापू येवले, धनंजय पाचा सोळंके, वैद्यकीय अधिकारी योगिता भगत, अंकुर भैया गरुड, शिवसेना उपशहरप्रमुख सुरेश नवले आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक अभिजीत आबा कौबडे, युवा सेना तालुकाप्रमुख माजलगाव यांनी पुढाकार घेतला.
-------
‘शासकीय कार्यालयांत नागरिकांशी सौजन्याने वागा’
बीड ः शासकीय कार्यालयांत येणाऱ्या अभ्यागतांशी संवेदनशीलपणे वागावे आणि योजनांची नागरिकांना पूर्ण माहिती द्यावी, असे आवाहन महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा बालविकास अधिकारी कालिदास बडे यांनी केले. पदभार स्वीकारल्यानंतर आयोजित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. बडे म्हणाले की, नागरिकांशी नकारात्मक भावनेतून न बोलता त्यांना योग्य मार्गदर्शन करावे. दुष्काळी स्थितीत नागरिकांची मनस्थिती ओळखून कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी सहानुभूतीपूर्वक आणि प्रेमाने वागावे. एखादा नागरिक रागाने बोलला, तरी उलट न बोलता वरिष्ठांशी बोलण्यास सांगावे. तसेच, वैयक्तिक लाभाच्या योजनांची कार्यवाही तातडीने करण्याचे आवाहनही त्यांनी केले. बैठकीला सीडीपीओ, पर्यवेक्षिका आणि विस्तार अधिकारी उपस्थित होते.
-----
जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत पटकावली सुवर्णपदके
माजलगाव ः जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेत येथील कराटे मार्शल आर्ट असोसिएशन आणि द युथ शोतोकान कराटे डू अकॅडमीच्या दहा खेळाडूंनी सुवर्णपदके पटकावत उल्लेखनीय यश मिळविले. १२ व १३ ऑक्टोबरला झालेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटातून सृष्टी जाधव, आरोही सोबने, शिवानी बादा, आराध्या राक्षे, अनन्या मुंडे आणि प्राची मस्के यांनी सुवर्णपदक मिळविले. मुलांच्या गटातून यशवंत सक्राते, मयुरेश अस्वले, कार्तिक चौरे आणि संतोष जंग यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरले. खेळाडूंनी मेहनत, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर हे यश संपादन केले. या खेळाडूंना चंद्रमणी डोंगरे यांचे मार्गदर्शन लाभले.
------
वृद्धाश्रमात आजी-आजोबांना किराणा सामानाचे वाटप
केज ः केज येथील श्री स्वामी समर्थ वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसाठी भाजपचे तालुका सरचिटणीस चंदू मिसाळ यांनी किराणा सामान देऊन सामाजिक बांधिलकी जपली. यंदा दुष्काळाच्या भीषण संकटामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अंबाजोगाईचे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी वाढदिवस साजरा न करता अनावश्यक खर्च टाळून गरजू व्यक्तींना मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोल्हेवाडी येथील चंदू मिसाळ यांनी हे किराणा साहित्य वाटप केले. या उपक्रमाप्रसंगी बाजार समितीचे उपसभापती डॉ. वासुदेव नेहरकर, चंदू मिसाळ आणि वृद्धाश्रमाचे संचालक बापू कराड हे आवर्जून उपस्थित होते.
------
राज्यस्तरीय कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
बीड ः येथील मिल्लिया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयातील इतिहास विभाग व संगणकशास्त्र विभागाच्या वतीने प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी प्रशिक्षण या विषयी सोमवार (१९ ऑक्टोबर) रोजी कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेसाठी विद्यार्थी, प्राध्यापकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांना ऑन दि जॉब ट्रेनिंग देण्याचे महत्त्व तसेच रोजगारभिमुख कौशल्यांचा विकास या विषयी डॉ. शेख हुसेन इमान यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील यांनी देखील मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. अब्दुल अनीस यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. शेख नईम यांनी केले.
-----
मोफत दंतचिकित्सा शिबिराचे यशस्वी आयोजन
शिरूर कासार ः कालिकादेवी महाविद्यालयातील विविध विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने १६ ऑक्टोबर रोजी महिलांसाठी मोफत दंत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विश्वास कंधारे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून रोहिदास गाडेकर, नगराध्यक्षा प्रतिभा गाडेकर, ट्रस्टी रावसाहेब गाडेकर, दत्ता गाडेकर व डॉ. योगेश शिंदे उपस्थित होते. डॉ. शिंदे यांनी दातांचे आणि महिलांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. कंधारे यांनी आरोग्यविषयक उपक्रमांची गरज स्पष्ट केली, तर रोहिदास गाडेकर यांनी नवरात्र हा स्त्रीशक्तीचा जागर असल्याचे सांगितले. प्रास्ताविक डॉ. श्यामा लोमटे, सूत्रसंचालन डॉ. चेतना डोगंळीकर यांनी केले व आभार प्रा. प्रीती विधाते यांनी मानले.
------
रामगड येथे वारकरी गुरुकुलाची मुहूर्तमेढ
बीड ः श्री क्षेत्र रामगड येथे दसऱ्याच्या पावन पर्वावर वारकरी संप्रदायाच्या आध्यात्मिक शिक्षणाची परंपरा जपणाऱ्या निवासी गुरुकुलाची मुहूर्तमेढ उभारण्यात आली. गडाचे महंत स्वामी योगीराज महाराज यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करून पूजन झाले. येथे ५ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबत मृदंग, हार्मोनियम, ज्ञानेश्वरी आणि संस्कारांचे निवासी शिक्षण दिले जाईल. येत्या जूनपासून नाममात्र शुल्कात प्रवेश दिला जाणार असल्याचे महंत स्वामी योगीराज महाराज यांनी सांगितले. दसरा मेळाव्यात त्यांनी व्यसनमुक्ती, पर्यावरण संवर्धन आणि समाजातील सद्भावनेचा संदेश दिला. याप्रसंगी काढलेल्या मिरवणुकीत आणि शमी पूजनात साधुसंत, वारकरी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.