छत्रपती संभाजीनगर

भुयारी मार्गाचे खोदकाम होऊन दहा दिवस उलटले; बांधकाम संथगतीने, भाविकांची गैरसोय!

CD
GLB26B02707, GLB26B02708 छायाचित्र ओळ वेरूळ ः येथे सुरू असलेले भुयारी मार्गाचे काम. भुयारी मार्गाचे खोदकाम होऊन दहा दिवस उलटले; बांधकाम संथगतीने, भाविकांची गैरसोय! धुळीचा त्रास, दिशादर्शक फलकांचा अभाव; खोदकाम परिसरात अपघाताचा धोका खुलताबाद, ता. १४ (बातमीदार) : वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिर विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या भुयारी मार्गाच्या कामाचे खोदकाम होऊन दहा दिवस उलटले, तरीही बांधकामाला अपेक्षित गती मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे देशभरातून येणाऱ्या भाविकांसह पर्यटकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर धुळीचे साम्राज्य पसरले असून, दिशादर्शक फलकांचा अभाव आणि खोदकाम परिसरात पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याने भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. श्री घृष्णेश्वर मंदिरात जाण्यासाठी मंदिर विकास आराखड्यांतर्गत भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी सुमारे ५० फूट लांब आणि १५ फूट रुंदीचे खोदकाम करण्यात आले असून, खोदकामाचा टप्पा अंतिम अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, खोदकामानंतर पुढील बांधकामाला अपेक्षित वेग मिळत नसल्याने कामाचा परिसर धूळ आणि मातीने व्यापला आहे. परिणामी, मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना या धुळीतून वाट काढत मंदिर गाठावे लागत आहे. धुळीमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनविकार असलेल्या भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. धुळीच्या सततच्या संपर्कामुळे दमा तसेच श्वसनाशी संबंधित आजारांचा त्रास वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेने खोदकाम परिसरात नियमित पाणी फवारणी करून धूळ नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भाविकांकडून होत आहे. वाहनतळापासून मंदिरापर्यंत पायी प्रवास प्रशासनाने मंदिराच्या धर्मशाळेच्या प्रांगणातून चारचाकी वाहनांची ये-जा होऊ शकेल, एवढाच मार्ग उपलब्ध करून दिल्याने भाविकांना आपली वाहने दूर अंतरावर उभी करावी लागत आहेत. त्यानंतर मंदिरापर्यंत पायी जावे लागत असल्याने ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि चालण्यास अडचण असलेल्या भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषतः गर्दीच्या वेळी मंदिराकडे जाण्यासाठी योग्य मार्ग शोधताना भाविकांची धावपळ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दिशादर्शक फलक नसल्याने भाविक संभ्रमात मंदिराकडे जाणारे पर्यायी रस्ते कोणत्या दिशेने आहेत, याची माहिती देणारे दिशादर्शक फलक प्रशासनाकडून अद्याप लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अनेक पर्यटक आणि भाविक खोदकाम सुरू असलेल्या परिसराकडेच जात असल्याचे दिसून येते. खोदकामाचा भाग म्हणजे मंदिराकडे जाण्यासाठी तयार करण्यात आलेला नवीन मार्ग असावा, असा गैरसमज होण्याची शक्यता आहे. परिणामी, भाविकांना योग्य मार्ग शोधण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. खोदकाम परिसरात सुरक्षेचा अभाव भुयारी मार्गाच्या खोदकाम परिसरात सुरक्षेच्या उपाययोजनाही अपुऱ्या असल्याचे दिसून येत आहे. कंत्राटदाराने एका बाजूला बांबू लावून त्यावर ग्रीन नेट लावली असली, तरी उर्वरित तीन बाजू खुल्या असल्याने भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गर्दीच्या वेळी एखादा भाविक किंवा लहान मूल तोल जाऊन खड्ड्यात पडण्याची अथवा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. श्री घृष्णेश्वर मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याने येथे वर्षभर देशाच्या विविध भागांतून भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे मंदिर परिसरातील विकासकामे करताना भाविकांच्या सोयीसुविधा आणि सुरक्षिततेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या कामामुळे भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने प्रशासनाने या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. संबंधित प्रशासनाने भुयारी मार्गाच्या कामाला गती द्यावी, खोदकाम परिसरात सर्व बाजूंनी सुरक्षित संरक्षक कठडे उभारावेत, धूळ नियंत्रणासाठी नियमित पाणी फवारणी करावी आणि मंदिराकडे जाणाऱ्या पर्यायी मार्गांवर दिशादर्शक फलक लावावेत. तसेच ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना मंदिरात जाण्यासाठी सुरक्षित व सोयीस्कर मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा शिवभक्त आणि पर्यटकांकडून व्यक्त होत आहे.

Hingoli District Earthquake : हिंगोली जिल्ह्याला पुन्हा भूकंपाचा धक्का, रिश्टर स्केलवर २.९ तीव्रतेची नोंद

IND vs WI : अर्शदीप सिंग पाचव्या T20I मधून बाहेर गेला, तर त्याची जागा कोण घेणार; ३६ वर्षीय गोलंदाजाच्या कमबॅकची तुफान चर्चा

Latest Marathi News Update: ‘मकोका’तील फरार आरोपीला आंध्र प्रदेशातून अटक

FDA Strict Action : मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग अन् भेसळीला पूर्ण बंदी! आयुक्त तुकाराम मुंढेंकडून कडक नियमावली जारी; नियम मोडल्यास थेट कारवाई

Neha Bora: 'सीजेपी'च्या पत्रकार परिषदेत गोंधळ अन् घोषणाबाजी; आंदोलनाची पुढची दिशा केली स्पष्ट

SCROLL FOR NEXT