छत्रपती संभाजीनगर

पाच घाघरी पाण्यात पिकतोय १९२ किलो चारा

CD
पाच घागरी पाण्यात पिकतोय १९२ किलो चारा दुष्काळावर मात करणारा कौडगावच्या सावित्रा राठोड यांचा ‘हायड्रोपोनिक’ प्रयोग सकाळ वृत्तसेवा ः धाराशिव, ता. २४ ः कमी पाऊस आणि दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या जिल्ह्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनलेला असताना कौडगाव येथील प्रयोगशील महिला शेतकरी सावित्रा राठोड यांनी आशेचा एक नवा मार्ग दाखवून दिला आहे. शेतीसाठी मोठी जमीन आणि मुबलक पाणी नसतानाही, त्यांनी आधुनिक ‘हायड्रोपोनिक’ तंत्रज्ञानाचा वापर करून अवघ्या आठ दिवसांत पाच घागरी पाण्यात मातीविना २८० किलो पौष्टिक हिरवा चारा तयार करण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य म्हणजे या पद्धतीत चारा तयार करण्यासाठी मातीची आवश्यकता नसते. विशिष्ट प्रकारच्या ट्रेमध्ये बियाण्यांची रुजवण करून नियंत्रित पाणीपुरवठा आणि योग्य वातावरणाच्या साहाय्याने हिरवा चारा तयार केला जातो. राठोड यांच्याकडे सध्या २० शेळ्या, २०० कोंबड्या आणि एक म्हैस आहे. ‘उमेद’कडून प्रशिक्षण घेऊन त्यांनी हायड्रोपोनिकचे २४ ट्रेचे युनिट उभारले आहे. त्यासाठी १५ हजार रुपये खर्च आला. एका ट्रेमधून आठ दिवसांत आठ किलो, असा एकूण १९२ किलो चारा निघतो. त्यासाठी केवळ पाच घागरी पाणी लागते. कोंबड्या आणि शेळ्यांना अत्यंत पौष्टिक चारा याद्वारे मिळतो. यापूर्वी राठोड यांना कोंबड्यांसाठी आठ दिवसांत ३६ रुपयांचे खाद्य आणावे लागत होते. आता माफक खर्चात चारा तयार होत आहे आणि पाण्याची गरजही अत्यंत कमी आहे. घरात किंवा अंगणात कमी जागेत हे युनिट उभारता येते. पाणीटंचाईच्या काळात पशुपालकांना हे आधुनिक तंत्रज्ञान दिशादर्शक असेच ठरत आहे. ---------- कमी संसाधनांत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पशुधनासाठी हिरवा चारा उपलब्ध करण्याचा हा प्रयत्न अत्यंत प्रेरणादायी आहे. महिलांनी शेतीपूरक व्यवसायात अशा आधुनिक पद्धती स्वीकारल्यास त्या स्वयंपूर्णतेच्या दिशेने नक्कीच वाटचाल करतील. - प्रियंवदा म्हाडदळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. धाराशिव ........ हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये व फायदे ः - या पद्धतीत मातीची अजिबात गरज नसते. नियंत्रित पाणीपुरवठ्यामुळे पारंपरिक शेतीपेक्षा तब्बल ९० टक्के पाण्याची बचत होते. - कमी जागेत जास्त उत्पादन : घरासमोरील अंगण किंवा लहान शेडमध्ये बहुमजली रॅक उभारून कमी जागेत मुबलक चारा पिकवता येतो. - बियाणे रुजवल्यानंतर अवघ्या ७ ते ८ दिवसांत जनावरांसाठी दर्जेदार चारा तयार होतो. - अधिक पौष्टिक व सुरक्षित : या चाऱ्यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि एन्झाइम्स मुबलक असतात. मातीचा वापर होत नसल्याने कीड व तणांचा प्रादुर्भाव टळतो, तसेच हा चारा मुळासकट जनावरांना देता येतो. ........ जिल्हा प्रशासनाकडून पाहणी आणि दखल या अभिनव उपक्रमाची दखल घेत धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांनी कौडगाव येथे प्रत्यक्ष भेट देऊन घेतली. प्रकल्पाची पाहणी करीत राठोड यांच्या कल्पकतेचे कौतुक केले. त्यांनी हायड्रोपोनिक युनिटमधील रॅकची रचना, ट्रे, बियाणे रुजविण्याची पद्धत आणि पाण्याच्या नियोजनाची सविस्तर माहिती घेतली. इतर शेतकरी, पशुपालक आणि महिला बचत गटांनी या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून याचा अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी केले. ....... धाराशिव ः कौडगाव (ता. धाराशिव) येथील सावित्रा राठोड यांनी उभारलेले ‘हायड्रोपोनिक’ चारा निर्मिती युनिट. (दुसऱ्या छायाचित्रात) या चाऱ्याचा उपयोग कोंबड्यांसाठी पौष्टिक खाद्य म्हणून करण्यात येत आहे. फोटो क्रमांक ःOSM26B07264, OSM26B07265, OSM26B07267

''पाकिस्तान आमचं संरक्षण करतोय, भारताकडून आता अपेक्षा नाही'', माजी मुख्यमंत्र्याच्या विधानानं खळबळ

Gold Jewellery Price: लग्नासाठी सोनं आत्ताच खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी? सोन्याचा भाव 1 लाखांपर्यंत येणार?

ड्रायव्हिंग लायसन्स काढणं होणार कठीण! ऑनलाइन परीक्षेत आता ७५% गुणांची अट, केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्याच्या कोरंभी बायपासवर भीषण अपघात; वाहतूक पोलिसाचा मृत्यू

VIRAT KOHLI: विराट कोहलीचा सराव सुरू, न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेचा थरार कधी रंगणार? जाणून घ्या ५ सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT