चौथ्या यादीत अडीच हजार शेतकरी पात्र
---------
कर्जमुक्ती योजनेत आतापर्यंत ६९ हजार ७९४ पात्र शेतकऱ्यांची नावे; ४८ लाभार्थींच्या कर्जखात्यात ३६५.१३ कोटी रुपये जमा
---
लातूर, ता. २३ : शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत लातूर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची चौथी यादी प्रसिद्ध झाली असून यामध्ये एकापेक्षा जास्त बँकांमध्ये कर्ज खाती असलेल्या आणि २ लाख रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या लातूर जिल्ह्यातील २ हजार ५२९ पात्र शेतकऱ्यांचा समावेश आहे. ही यादी आधार प्रमाणीकरणासाठी संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी विकास संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
यापूर्वी पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या यादीमध्ये मिळून लातूर जिल्ह्यातील एकूण ६९ हजार ७९४ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध झाली होती. आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या ४८ हजार ८१९ पात्र लाभार्थ्यांच्या कर्जखात्यात आतापर्यंत ३६५.१३ कोटी रुपयांची कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात आली आहे. चौथ्या यादीमध्ये नावे असलेल्या शेतकऱ्यांची कर्ज थकबाकीची रक्कम ही ३१ मार्च २०२६ पर्यंतची असून, १ एप्रिल २०२६ नंतरचे व्याज व इतर खर्च माफ केला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२६ रोजीच्या कर्ज थकबाकीची खातरजमा करून नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे.
राष्ट्रीयकृत आणि व्यापारी बँकांच्या बाबतीत ३१ मार्च २०२६ रोजीची थकबाकी २ लाख रुपयांपेक्षा जास्त असली, तरी शासनाच्या हेअर कट धोरणानुसार ही सर्व कर्जे माफ केली जाणार आहेत. तसेच, योजनेतील मयत, वयस्कर किंवा बोटांचे ठसे न उमटणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी १९ ऑगस्ट २०२६ रोजी जारी केलेल्या मानक कार्यप्रणाली (एसओपी) नुसार कार्यवाही केली जाईल.
जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड आणि सहकारी संस्थांचे विभागीय सहनिबंधक नानासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नवीन पीक कर्ज वाटप करण्याचे निर्देश शासनाने सर्व बँकांना दिले आहेत.
आधार प्रमाणीकरण आवश्यक
यादीतील ज्या शेतकऱ्यांनी अद्याप प्रमाणीकरण केलेले नाही, त्यांनी त्वरित जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी. आधार प्रमाणीकरण पूर्ण होताच कर्जमुक्तीची रक्कम थेट त्यांच्या कर्जखात्यात वर्ग केली जाईल, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व्ही. एल. पोतंगले यांनी केले.
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.